‘धनुष्यबाण’ कुणाच्या हाती जाणार? | पुढारी

‘धनुष्यबाण’ कुणाच्या हाती जाणार?

उदय तानपाठक, मुंबई : न्यायालयीन लढाईत अपयश आले तर नव्या चिन्हावर कदाचित लढावे लागेल, तेव्हा तयार राहा, असा संदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव सेना यांच्यात आता न्यायालयीन संघर्ष सुरू झाला आहे. शिंदे गटाला अपात्र ठरवण्यापासून विधानसभाध्यक्षांची निवड आणि नव्या सरकारची बहुमत चाचणी बेकायदा असल्याची तक्रार करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या सर्वच याचिकांचे भवितव्य येत्या 11 जुलैच्या सुनावणीदरम्यान ठरेल. पुढे मग निवडणूक चिन्हावर हक्‍क वगैरे गोष्टी निवडणूक आयोगासमोर जातील. म्हणजेच शिवसेना आणि शिंदे गट आता न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाच्या कक्षेत जातील. निवडणूक आयोगापुढे चिन्हाबद्दलचा वाद गेल्यास ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले जाण्याची शक्यता आहे. त्यावर निकाल लागेपर्यंत दोन्ही गटांना तात्पुरती चिन्हे घेऊन निवडणुका लढाव्या लागतील. याची कल्पना आल्यानेच नव्या चिन्हासाठी तयार राहा, असे वक्‍तव्य उद्धव ठाकरे यांनी केले असावे.

वास्तविक निवडणूक चिन्ह म्हणजे एखाद्या व्यापारी कंपनीचा लोगो नाही. लोगो बदलला तर ग्राहक गोंधळतो. हा गोंधळलेला ग्राहक बांधून ठेवणे आणि इतरत्र जाऊ न देणे हे त्या कंपनीसमोरचे आव्हान असते. निवडणूक चिन्हाचे तसे नाही. त्या पक्षाची विचारधारा, तत्त्वज्ञान, नेतृत्व यावर मतदार आपले मत ठरवतात. शिवसेनेने याआधीही ‘ढाल-तलवार,’ ‘उगवता सूर्य’ अशा निवडणूक चिन्हांवर निवडणुका लढविल्या होत्याच. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह खूप नंतर आले. मात्र चिन्ह बदलूनही मतदार बिचकला नाही. नव्या चिन्हावरही त्याने शिवसेनेलाच भरभरून मते दिली.

या पार्श्‍वभूमीवर जरा चिन्हांचा पूर्वेतिहास पाहू. श्रीमती इंदिरा गांधी राजकारणात सक्रिय झाल्या त्यावेळी ‘बैलजोडी’ हे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह होते. पुढे मूळ काँग्रेस फोडून इंदिराजी बाहेर पडल्या आणि त्यांच्या गटाला ‘गाय वासरू’ हे चिन्ह मिळाले. या नव्या चिन्हावर लढूनही इंदिरा काँग्रेसला बर्‍यापैकी यश मिळाले. पुढे 1980 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा पक्ष फोडला आणि ‘हाताचा पंजा’ हे निवडणूक चिन्ह घेतले. आजही हे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह काँग्रेसकडेच आहे. हा इतिहास लक्षात घेतला, तर धनुष्यबाण मूळ शिवसेनेकडून गेले, तरी पक्षाच्या जय पराजयावर फारसा परिणाम आज तरी होईल, असे वाटत नाही. त्यामुळे नवे निवडणूक चिन्ह मिळाले तरी त्यासह निवडणूक लढवण्यास घाबरण्याचे कारण नाही. आता मतदारही निवडणूक चिन्हाच्या पलीकडे जाऊन स्वत:ची राजकीय मते ठरवतात. त्यामुळे निवडणूक चिन्ह हे फारसे महत्त्वाचे नाही, तर पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारधारा लक्षात घेऊन मतदार मते देतो.

अर्थात पूर्वीच्या काळात शिक्षणाचे प्रमाण फार कमी होते. कित्येक गावात तर वर्तमानपत्रही येत नव्हते. त्यामुळे गांधी-नेहरूंचा पक्ष म्हणजेच काँग्रेस हीच लोकांची धारणा होती. राजकीय जागृती होत असली, तरी तिचा वेग खूपच कमी होता. पुढे शिक्षणाचा प्रसार झाला. सामान्य माणसाच्या मनात राजकीय मते, समज तयार होत गेली. मग निवडणूक चिन्ह हा उपचार ठरत गेला. आताचा तरुण मतदार चिन्हापेक्षा पक्ष आणि त्या पक्षाचा उमेदवार लक्षात घेऊन मत देतो. ट्रेड मार्क बदलला तर लोक बनावट माल समजून वस्तू विकत घेणार नाही. मात्र राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे तसे नाही.

आता ‘धनुष्यबाण’ या चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची मूळ शिवसेना यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू होईल. तसे झाले, तर ही युद्धाची केवळ सुरुवात असेल. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले असेल, मात्र शिवसेनेचे नाव, चिन्ह आदींसह अनेक गोष्टी अजूनही त्यांच्याकडेच आहेत. संघर्ष संपवायचा तर दोन्ही गटांत तडजोड व्हावी लागेल. तूर्त तरी तशी शक्यता दिसत नाही.

मात्र ठाकरे-शिंदे यांच्यात समझोता झाल्यास परिस्थिती वेगळी असेल. दोघांची मूळ विचारधारा एकच असल्याने बंडाची कटुता विसरून ‘पुनश्‍च हरिओम’ करणे अवघड जाणार नाही.

हेही वाचा

Back to top button