राज्यात तिसर्‍या दिवशीही मुसळधार; कोकणात सर्वाधिक पाऊस | पुढारी

राज्यात तिसर्‍या दिवशीही मुसळधार; कोकणात सर्वाधिक पाऊस

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाने जोर धरला आहे. सलग तिसर्‍या दिवशी कोकणात अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईतही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 10 जुलैपर्यंत राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने कोल्हापूर (घाटमाथा), पुणे (घाटमाथा), पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा (घाटमाथा) या जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट (अतिमुसळधार) जारी केला असून, सावधानतेचा इशारा दिला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा बुधवारी कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सरकला आहे. त्याची तीव—ता कायम आहे. याबरोबरच आणखी एक कमी दाबाचा पट्टा कच्छमध्ये सक्रिय असून, मान्सून ट्रफ देसा, राजगड, सिद्धी, अंबिकापूर, भुवनेश्वर या ओडिशाजवळच्या भागात आहे. त्यामुळे राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे.

मुंबईलाही झोडपले
दरम्यान, मुंबई व उपनगरांत सलग दोन दिवस धुवाँधार बॅटिंग करणार्‍या पावसाने मंगळवारी रात्री विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारी सकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. या पावसाने मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. वसई-विरारमध्ये मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला. त्यामुळे या भागातील चाकरमान्यांनी कामावर दांडी मारली. परिणामी सकाळी प्रवाशांनी खचाखच भरून धावणार्‍या लोकलनाही गर्दी कमी होती. पावसाचा सर्वाधिक फटका दादर व अन्य मार्केटमध्ये होलसेल भाजी विक्रेत्यांना बसला.

हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे : रेड अलर्ट (अतिमुसळधार) : पालघर- (8 जुलै), रायगड (7 ते 9 जुलै), रत्नागिरी (7 ते 9 जुलै), सिंधुदुर्ग (8 आणि 9 जुलै), पुणे (घाटमथा-7 आणि 8 जुलै), कोल्हापूर (घाटमाथा- 7 ते 9 जुलै), सातारा (घाटमाथा- 7 आणि 8 जुलै).
ऑरेज अलर्ट (मुसळधार) : पालघर- (7, 9, 10 जुलै), ठाणे (7 ते 10 जुलै), मुंबई (7 ते 10 जुलै), रायगड (10 जुलै), रत्नागिरी (10 जुलै), सिंधुदुर्ग (10 जुलै), नाशिक (7 व 8 जुलै), पुणे (घाटमाथा-9 व 10 जुलै), कोल्हापूर (10 जुलै), सातारा (9 व 10 जुलै).

जिल्ह्यात चांगला पाऊस; दोन दिवस ‘रेड अलर्ट’
पुणे शहरासह जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड व घाटमाथ्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असून, 7 व 8 जुलै रोजी घाट माथ्यावर ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. लोणावळा 184 मिमी, लवासा 168 मिमी, गिरीवन 82 मिमी, भोर 62.5 मिमी, चिंचवड 54.5 मिमी, तळेगाव 46 मिमी, लवळे 31 मिमी, माळीण 27 मिमी, दुदलगाव 23 मिमी, शिवाजीनगर 23 मिमी, पाषाण 21 मिमी, बालेवाडी 18 मिमी, वडगाव शेरी 17 मिमी, कोरेगाव पार्क 15 मिमी, निमगिरी 14 मिमी, राजगुरुनगर 12 मिमी, मगरपट्टा 10 मिमी, शिरूर 6 मिमी एवढा पाऊस शहरासह जिल्ह्यात झाला आहे. मात्र पुरंदर, तळेगाव ढमढेरे, इंदापूर, दौंड, बारामती, आंबेगाव व हवेली तालुक्यांत मात्र 1 ते 3 मिमी एवढाच पाऊस झाला आहे.

Back to top button