पुणे शहरातील पाणीकपात तूर्त रद्द | पुढारी

पुणे शहरातील पाणीकपात तूर्त रद्द

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शहरात सुरू असलेली पाणीकपात महापालिका प्रशासनाने तूर्तास रद्द केली आहे. दि. 10 जुलैला आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण असून, एक दिवसाआड पाणीपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यासाठी 8 ते 11 जुलैदरम्यान शहरात पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा सुरू राहील, असे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले आहे. संपूर्ण जून महिना पावसाने दांडी मारल्याने शहरातील पाणीपुरवठा करणार्‍या धरणातील पाणीसाठा तळाला गेला होता. त्यामुळे महापालिकेने सोमवार 4 जुलैपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.

मात्र, ही पाणीकपात सुरू झाल्यापासून शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांतूनही मोठ्या प्रमाणावर तक्रारी सुरू झाल्या. त्यातच येत्या रविवारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने बुधवारी घेतला. या कालावधीत एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

पावसाने कपातीचे विघ्न दूर होणार
पाणीकपात सुरू झाल्यापासून खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे चारही धरणांतील पाणीसाठा अवघ्या तीन दिवसांत अडीच टीएमसीवरून चार टीएमसीवर पोहचला आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर चांगला राहिल्यास धरणांत पुरेसा साठा होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे तूर्तास रद्द झालेली पाणीकपात पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.

Back to top button