पावसाचा इशारा | पुढारी

पावसाचा इशारा

पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणसह मुंबईत कोसळणार्‍या पावसाने धडकी भरवली असून पुन्हा एकदा महाराष्ट्र चिंताक्रांत बनला आहे. रान आबादानी होण्यासाठी पावसाची आवश्यकता असली, तरी त्यामुळे जनजीवन पाण्याखाली जाऊ नये, एवढीच सगळ्यांची प्रार्थना असते. अलीकडच्या काळात महापुराचे सातत्य वाढल्यामुळे दरवर्षीच नदीकाठच्या लोकांना महापुराच्या दहशतीखाली राहावे लागते. अवघ्या तीन-चार दिवसांपूर्वी पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्र वेगळ्याच चिंतेत असल्याचे चित्र होते.

धरणांची पाणी पातळी खालावली होती. पेरण्या खोळंबल्या आणि जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्‍न गंभीर निर्माण झाला. सात जून ही पावसाच्या आगमनाची तारीख म्हणून वर्षानुवर्षे ओळखली जाते. परंतु, अलीकडच्या काळात हवामान बदलामुळे पावसाला मुहूर्त कधीच साधता आला नाही. कधी मान्सूनपूर्व पाऊस उच्छाद मांडतो, तर कधी जुलै उजाडेपर्यंत तोंड दाखवत नाही. यंदाही हवामान विभागाने सरासरीइतका पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्‍त केला.

मान्सून गोव्यात, कोकणात दाखल होत असल्याची द्वाही फिरवण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात हुलकावणीच मिळाली. जवळपास महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाने सुरुवात केली तेव्हा सगळ्यांनाच दिलासा मिळाला; परंतु हा दिलासा काही तासांतच चिंतेमध्ये बदलला. पावसाचा जोर वाढत गेला आणि तो थांबण्याचे नावच घेत नाही. गोव्यात तर दोन दिवसांपूर्वीपासूनच पावसाने उच्छाद मांडला आणि जनजीवन विस्कळीत केले. गोव्यापाठोपाठ कोकणातही तो धुमाकूळ घालू लागला तेव्हा मुंबईसह पश्‍चिम महाराष्ट्रातही त्याचा जोर वाढू लागला. कोकणात तो पुराबरोबर इतरही अनेक संकटे घेऊन येत असतो. कोसळणार्‍या दरडींच्या भीतीने अनेक वाड्या-वस्त्या जीव मुठीत घेऊन दिवस काढत असतात. पूल पाण्याखाली जातात.

रस्ते खचतात, दरडी कोसळून वाहतुकीचा बोजवारा उडतो. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दरड कोसळल्यामुळे घाटातील वाहतूक बंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे हा घाट धोकादायक स्थितीत असल्यामुळे घाट बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. मुंबईकरांपुढे गेल्या आठवड्यात पाणीटंचाईचे संकट होते. सोमवारी दिवसभर आणि रात्री कोसळलेल्या पावसाने परिस्थितीत अचानक बदल घडवला आणि मुंबई जलमय होऊन गेली. रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवेलाही फटका बसला. मुंबईकरांनी आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असा सावधगिरीचा इशारा प्रशासनाला द्यावा लागला. एकूणच गोव्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांत पावसाने त्रेधा उडवली. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून पावसाचा जोर कमी झाला नाही, तर कोकणातील परिस्थिती गंभीर बनण्याचा धोका आहे.

हवामान विभागाचे अंदाज म्हणजे हमखास उलटे घडण्याची शक्यता, असे मानले जाते. वर्षानुवर्षाच्या कर्तृत्वातून हवामान विभागाने हा लौकिक कमावला! तरीसुद्धा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजांची दखल घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागते. ताज्या अंदाजानुसार येत्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्‍त केली आहे.विदर्भात तसेच मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तो खरा ठरला, तर परिस्थिती गंभीर बनू शकते. कोकणात दरडी कोसळण्याची भीती, मुंबईत लोकलसेवा बंद होण्याची, तसेच धोकादायक इमारती कोसळण्याची भीती वर्षानुवर्षांची आहे.

सरकारे आली, गेली तरी या भीतीपासून मुक्‍तता झालेली नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे दुखणे संपलेले नाही. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्रापुढे महापुराचे संकट आ वासून उभे आहे. पावसाळ्यात नद्यांना पूर दरवर्षीच येतो; परंतु पूर्वी महापूर येण्याचे प्रमाण साधारणपणे दहा वर्षांतून एकदा असायचे. ते पाच वर्षांवरून आता वर्षावर आले. दरवर्षीच महापुराचा वेढा पडू लागला. महापूर आल्यानंतर एनडीआरएफ वगैरे पाठवून तत्परता दाखवली जाते. परंतु, इथेही पुन्हा सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा मुद्दा येतोच. महापुरापासून मुक्‍ततेसाठी आजवर अनेक घोषणा झाल्या. परंतु, त्यांची अंमलबजावणी करण्याकडे कुणी गांभीर्याने लक्ष दिले नाही. महापुराच्या काळात केलेल्या घोषणा महापूर ओसरल्यावर वाहून जातात.

सोमवारी एका दिवसात पंचगंगेची दहा फुटांनी वाढलेली पातळी ही धोक्याची घंटा असून पुढील अनर्थ टाळण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. अर्थात, अशा प्रसंगी केवळ प्रशासनावर सगळे ढकलून नामानिराळे राहता येणार नाही, हेही लक्षात घ्यावयास हवे. पावसाचे पाणी वाढतेय, हे दिसत असूनही पाऊस थांबेल आणि पाणी ओसरेल अशी आशा बाळगून लोक पुराच्या पाण्यात थांबतात. त्याचा ताण नंतर प्रशासनावर येत असतो शिवाय संबंधितांचा जीवही धोक्यात सापडू शकतो. भूतकाळातला अनुभव लक्षात घेऊन अशा पूरप्रभावीत क्षेत्रातील नागरिकांनी खबरदारी घेतली, तर आयत्यावेळची त्रेधातिरपीट वाचेल.

पश्‍चिम महाराष्ट्रातील महापुराच्या कारणांची वर्षानुवर्षे चर्चा होत आहे. आता या कारणांमध्ये सर्वसामान्य माणसांना रस राहिलेला नाही किंवा पूरस्थितीची पाहणी करायला येणार्‍या नेत्यांच्या दौर्‍यांचेही आकर्षण राहिलेले नाही. लोकांना घरदार सोडून कुठेतरी शाळेत, मंदिरात आसरा घ्यावा लागतो. अशा स्थितीत महापुराची परिस्थिती म्हणजे नेत्यांसाठी पावसाळी पर्यटनासारखे असते. आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे असले, तरी आपत्ती टाळण्यासाठीच्या उपाययोजना त्याहून महत्त्वाच्या असतात.

दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका मोठा असतो. आलमट्टी धरणासह कोयना, वारणा, राधानगरी धरणांच्या पाणी विसर्गात समन्वय महत्त्वाचा ठरतो. ही यंत्रणा यंदा कार्यक्षम आणि सतर्कतेने काम करेल अशी आशा. पावसाने शेतीच्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल, हे खरे असले, तरी महापुराचे संकट समोर आ वासून उभे असताना पावसाचा आनंद व्यक्‍त करता येत नाही, हेच सामान्य माणसांचे दुखणे आहे.

Back to top button