रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात पडणार? | पुढारी

रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात पडणार?

नवीन पनवेल, सचिन जाधव : महाडचे आमदार भरत गोगावले सारखा हाडामासाचा कार्यकर्ता पक्ष नेतृत्वामुळे दुखावला होता. याचा परिपाक पुऱ्या महाराष्ट्राने पहिला आहे. आता ज्या रायगडाने आमदार मंडळीची होणारी कुचंबना थांबवा अशी आर्त हाक दिली होती, त्याच रायगडच्या पालकमंत्री पदाची वर्णी आता कोणाची लागणार याकडे सर्व रायगडचे लक्ष लागले आहे. या वेळी महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात पालकमंत्री पदासह कोणत्या मंत्री पदाची लॉटरी लागणार ही उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

नुकताच सत्तेचा सारीपाट संपला आहे. पटावर मात देत नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुबीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले यात शिवसेनेच्या 54 पैकी 39 आमदार मंत्री महोदयांनी बंड करत पक्षात होणारी कुचंबना थांबवा असा सूर छेडत गुवाहाटी गाठले. यात सुरवातीलाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करत सारे काही आलबेल आहे. असा सूर आळवला ते म्हणजे सेनेची मुलुख मैदान तोफ भरत गोगावले यांनी. रायगडच्या शिवसेनेच्या दोन आमदारांना अलिबाग मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जत विधानसभा आमदार महेंद्र थोरवे यांना एकत्र घेत माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून दुजाभाव मिळत असल्याची तक्रार करत.

होत असणाऱ्या कामाचे श्रेय लाटले जात आहे. आज पर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा अनुभव म्हणून रायगडचा पालकमंत्री म्हणून मलाच संधी हवी होती. अशी विनवणी मातोश्रीवर केली होती. पण रायगडच्या या तिन्ही आमदारांना मातोश्रीने दुर्लक्षित केले अखेर या 39 आमदारांनसह अपक्ष आमदारांची गाऱ्हाणे ऐकत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. रायगडची खद खद उफाळून बाहेर आली आणि महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. अनेक आरोप झाले पण बंडखोर आमदार हे सारे सोसत होते.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ती पहाट उजाडली. विधानभवनात इतरवेळी विरोधात धडधडणारी गुलाबराव पाटील नावाची तोफ या वेळी पक्ष नेतृत्वाभोवती असणाऱ्या कोंडाळ्याविषयी बोलून गेली. कार्यकर्त्यांना भेटत नाहीत साधा फोटो काढला जात नाही. कामे केली जात नाहीत, असे गंभीर आरोप केले.

राजकारणात काही ही होऊ शकते हे आता सत्यात उतरताना दिसत आहे. या पूर्वी अनेक बंडे शिवसेनेने पाहिली आहेत. पण या वेळचे बंड हे सेनेला कदाचित परवडणारे नाही. कारण 54 पैकी तब्बल 39 आमदार असा निर्णय घेतात ते ही मुख्यमंत्री स्वतः सेना प्रमुख असताना, ही बाब राजकीय गणिते बदलून टाकणारी आहे.

भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचा अधिकार आहे, असे पक्षनेतृत्वाला सांगितल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचा एकमेव आमदार ह्या रायगडमध्ये असताना रायगडला सेनेच्या कोट्यातून मंत्री पद नाही ही तक्रार वारंवार केली जात होती. पण त्याकदे दुर्लक्ष केले गेले. त्यातूनच सतेचा सारीपाट सुरू झाला आणि शिवसेनेतील शिंदे गट-भाजपचे सरकार निर्माण झाले. आता रायगडच्या तिन्ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठी ठाम उभे राहून त्यांना मुख्यमंत्री करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे आता भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करून उतराई करण्याची वेळ आली आहे. अगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे प्राबल्य वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरत गोगावले यांच्या सारख्या नेत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ताकत देतील अशी रायगडच्या जनतेला आशा आहे.

Back to top button