विक्रमी पावसाने मुंबईची दाणादाण | पुढारी

विक्रमी पावसाने मुंबईची दाणादाण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  गुरुवारी रात्रभर कोसळत राहिलेला पाऊस शुक्रवारीही दिवसभर सुरूच राहिल्याने मुंबईच्या अनेक भागांची तुंबई झाली आणि सलग दुसर्‍या दिवशी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी उद्भवली. मुंबई तुंबली, पण ती पावसामुळे, पालिकेच्या कारभारामुळे नव्हे, असा खुलासा महापालिकेने केला असून, त्यास हवामान खात्याच्या आकड्यांनीही दुजोरा दिला आहे.

कुलाबा वेधशाळेत 227.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 2015 नंतर एका दिवसात कोसळलेला हा सर्वाधिक पाऊस होय. यापूर्वी 2014 साली 15 आणि 16 जुलैदरम्यान 24 तासांत 228 मिमी पाऊस कोसळला होता. हवामान खात्याने मुंबईला चार दिवस मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला असून, या इशार्‍याचा जणू मान ठेवत पाऊस कोसळू लागला आहे.

गुरुवार, शुक्रवार मिळून सर्वाधिक पाऊस लोअर परळ, वरळी, दादर, वांद्रेमध्ये झाला. जिथे पाणी तुंबत नाही असे ब्रिच कॅण्डी, गिरगाव, चर्चगेट, मरिन लाईन्ससारखे भागही पाण्यात गेले. कुर्ल्यासारखा सखल भाग नेहमीसारखा तुंबला. अंधेरी सबवे दिवसभर बंद करावा लागला. पाणी उपसल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता तो खुला झाला. सायन आणि चेंबूरमध्ये पाणी तुंबल्याने बेस्टच्या 16 गाड्यांचा मार्ग बदलावा लागला.

Back to top button