उद्धवजींनी सर्वांना सोडले पण…पवारांना सोडले नाही : गुलाबराव पाटील यांची खंत | पुढारी

उद्धवजींनी सर्वांना सोडले पण...पवारांना सोडले नाही : गुलाबराव पाटील यांची खंत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, आम्हा सर्व आमदारांना सोडले, त्यांनी सर्व काही सोडले, पण शरद पवारांना सोडले नाही, अशी खंत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. हे सरकार जाणार की राहणार याचा फैसला आता गुरुवारी (दि.३०) होणार आहे.

सध्या गुवाहाटीत असलेले शिंदे गटाचे आमदार आता मुंबईला येण्यासाठी बॅगा भरून सज्ज झाले आहेत. हॉटेल सोडण्यापूर्वी गुलाबराव पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरेयांच्या विषयी खंत व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी सर्व काही सोडले, आम्हा सर्वांना सोडले, पण शरद पवारांना काही सोडले नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले. त्याचवेळी आपल्या शेरोशायरीतून एकनाथ शिंदे यांना दोस्ती निभवण्याचा शब्द दिला.

या बंडखोर आमदारांनी काँग्रेस – राष्ट्रवादीची साथ सोडा आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करा, अशी अट उद्धव ठाकरे यांना घातली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी ही अट मान्य केली नाही. मुंबईत या, समोर बसा आपण सर्व गोष्टीवर चर्चा करू, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना केले होते. मात्र ते देखील परतले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली. आता बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय झाल्यानंतर बंडखोर गटाचा आत्मविश्वास वाढला असून, उद्या आपलाच विजय होईल असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा:

 

Back to top button