राष्ट्रीय पक्षाची महाशक्‍ती पाठीशी : एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट | पुढारी

राष्ट्रीय पक्षाची महाशक्‍ती पाठीशी : एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय पक्षाची महाशक्‍ती आपल्या पाठीशी आहे. विजय आपलाच होईल. आपण एकजुटीने राहू, अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी परतीचे दरवाजे बंद करीत शिवसेनेची ऑफर धुडकावून लावली. दरम्यान, सत्तेची चाल कधी खेळणार याबद्दल शिंदे यांनी कमालीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. तूर्त आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, इतकेच त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करू, पण तुम्ही आधी परत मुंबईत या, असा प्रस्ताव शिवसेना प्रवक्‍ते संजय राऊत यांनी गुरुवारीच जाहीर केला. त्यानंतर एक प्रकारे हा प्रस्ताव धुडकावून लावत एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात आपल्या समर्थक आमदारांचे शक्‍तिप्रदर्शन करीत संख्याबळ दाखवून दिले. शिवसेनेचे 37 आमदार आणि याशिवाय 9 अपक्ष आमदार यांची बैठक घेत शिंदे यांनी या बैठकीचा व्हिडीओ माध्यमांना पाठवला. फोटोही पाठवले. याच बैठकीत शिवसेना आमदारांनी शिंदे यांची गटनेते म्हणून एकमुखाने निवड केली. एकेकाळी ‘मातोश्री’चे अत्यंत विश्‍वासू म्हणून गणले गेलेले तानाजी सावंत यांनी उभे राहून शिंदे यांचे नाव नेतेपदासाठी सुचवले. आम्ही सर्व आमदार आपणास आमच्याबद्दलचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देत आहोत, असे म्हणताना तानाजी सावंत दिसतात. त्यावर सर्व आमदारांनी हात उंचावून त्यावर शिक्‍कामोर्तब केले.

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना मार्गदर्शन करताना भाजपचे नाव न घेताही आपल्याला भाजपचा कसा पाठिंबा आहे हे अत्यंत छोट्या भाषणात सूचित केले. शिंदे म्हणाले, यापुढे तुमचे आणि आमचे सुख-दु:ख सारखेच. आपण एकजुटीने राहू, विजय आपलाच होईल. एक राष्ट्रीय पक्ष, महाशक्‍ती आपल्या पाठीशी आहे. या पक्षाने पाकिस्तानला धडा शिकवला. ‘त्यांनी’ मला सांगितले की तुम्ही जो निर्णय घेतला तो ऐतिहासिक आहे. कुठेही काही लागले तर कमी पडणार नाही, असे सांगतानाच जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा याची प्रचिती येईल, अशी ग्वाही देखील शिंदे यांनी दिली. या बैठकीनंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी मात्र भाजपचा आमच्या गटाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट सांगितले. आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ झाले आहे. पण एकटे सरकार बनवू शकणार नाही. त्यामुळे भाजपसोबत जावे लागेल, असेही गोगावले म्हणाले.

योग्य वेळी निर्णय घेऊ

दरम्यान, एएनआय या संस्थेशी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, मला 46 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात सहा-सात अपक्ष असून 38-39 शिवसेनेचे आमदार आहेत. ही संख्या आणखी वाढेल. भाजपकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. भाजपशी आमची चर्चादेखील सुरू नाही. आमची कुणाशीही चर्चा सुरू नाही. भाजपशीही नाही आणि शिवसेना किंवा मुख्यमंत्र्यांशीही नाही. आम्ही योग्य वेळी निर्णय घेणार आहोत.

Back to top button