शिवतीर्थावर नारायण राणे यांना शिवसेनेचा ग्रीन सिग्नल | पुढारी

शिवतीर्थावर नारायण राणे यांना शिवसेनेचा ग्रीन सिग्नल

मुबंई, पुढारी ऑनलाईन : जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करणाऱ्या नारायण राणे यांना शिवतीर्थावर जाण्यासाठी शिवसेनेने ग्रीन सिग्नल दिला आहे. राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी आल्यानंतर कुठलाही विरोध न करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर असंख्य लोक येतात.

आज जर कुणी आले तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. आमच्या पक्षनेतृत्वाने त्यांना रोखण्याचे असे कुठलेही आदेश दिलेले नाहीत.

मुळात कोण कधी पाया पडतो याला महत्त्व आहे. त्यामुळे ते आले काय आणि गेले काय याला फरक पडत नाही.

दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी काल राणे यांना स्मृतिस्थळावर रोखू असा इशारा दिला होता. राणे यांना येथे येण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका केली होती.

याबाबत सरवणक म्हणाले, ‘राऊत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमच्याकडे अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे कोण दर्शन घ्यायला येणार असतील तर त्यांना अडवले जाणार नाही.

दादर- माहीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भाजप तेथे प्रयत्न करत आहे. हा सेनेचा सन्मान आहे. कुणी काही करू द्या.

राणे शिवतीर्थावर आले तरी काही फरक पडणार नाही. अशा भावनिक हाकेने शिवसेनेला फरक पडत नाही. जनता सर्व काही जाणून आहे.’

राणे यांची आज मुंबईतून जनआशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. या यात्रेच्या माध्यमातून सामान्य जनतेशी संवाद साधावा,
असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

स्वपक्षातील विराोधकांनाच आव्हान

महाराष्ट्रात नवनिर्वाचित मंत्र्यांनी सुरू केलेल्या जनआशीर्वाद यात्रा या राजकीय विरोधकांच्या बालेकिल्ल्यात सुरू झाल्या आहेत.

बीडमध्ये भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांनी परळी येथील गोपीनाथ गडावरून जनआशीर्वाद यात्रा सुरू केली होती.

यावेळी पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणा देऊन या यात्रेत गोंधळ घातला होता.

आता नारायण राणे यांनी आपली जनआशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू केली आहे. नारायण राणे शिवतीर्थावर जाऊन दर्शन घेणार आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवतीर्थावर जाऊन राणे एकप्रकारे सेनेलाच आव्हान देणार आहेत.

Back to top button