सत्ताबदलाच्या शंकेने मंत्री चिंताक्रांत तर फाईल क्लिअर करण्याच्या कामाला वेग | पुढारी

सत्ताबदलाच्या शंकेने मंत्री चिंताक्रांत तर फाईल क्लिअर करण्याच्या कामाला वेग

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्य सरकारवर संकटाचे ढग दाटून आले असून, मंत्रीही चिंताक्रांत झाले आहेत. त्यामुळे फाईल क्लिअर करण्याच्या कामाला वेग आला आहे. तसेच मंत्री कार्यालयांतही धावपळ वाढली आहे. त्याचवेळी मंत्री कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचीही पुन्हा मूळ विभागात जावे लागू शकते म्हणून चिंता वाढली आहे.

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षार्ंंत आपली मोट बांधून ठेवली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडाने आघाडीचे जहाज फुटले आहे. त्यामुळे सरकार केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याने मंत्री धास्तावले आहेत. विशेषतः, शिवसेनेत सुरू असलेल्या संघर्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेणे भाग पडले आहे. परंतु, मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या फाईल क्लिअर करण्याचा सपाटा लावला आहे.

सध्या 30 जूनपर्यंत मुख्यमत्र्यांनी बदल्यांना स्थगिती दिली आहे. परंतु, सरकार पडले तर आपल्या बदलीचे काय होणार? याची चिंता अधिकारी आणि कर्मचार्‍यांना लागली आहे. परंतु, स्थगिती आदेश उठत नाही तोपर्यंत या फाईल क्लिअर होणार नाहीत. परंतु, मंत्री कार्यालयांत वर्दळ वाढली आहे. अन्य महत्त्वाची कामे उरकून घेण्यासाठी अभ्यागतांचीही रीघ लागली आहे.

Back to top button