सातारा : शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने बोट व्यवसाय ठप्प | पुढारी

सातारा : शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने बोट व्यवसाय ठप्प

बामणोली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने बामणोली तापोळा परिसरातील बोट व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. या संपूर्ण परिसरामध्ये शेकडो बोट चालक बोट व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. बामणोली, तापोळा, शेंबडी, मुनावळे या संपूर्ण परिसरामध्ये एकूण सहा बोटिंग संस्था कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून वर्षाकाठी शेकडो बोट चालक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा संसाराचा गाडा हाकत आहेत. मात्र यावर्षी शिवसागर जलाशयाच्या पातळीने तळ गाठल्याने या परिसरातील सर्व बोट चालकांना आपल्या बोटी कोरड्या नदीपात्रात उभ्या करण्याची वेळ आली आहे.

शिवसागर जलाशय : बोट व्यवसाय पूर्णपणे ठप्प

तापोळा ते खरोशी, रेनोश, तापोळा ते गोगवे या दोन्ही बाजूच्या नदीपात्रात पाणी शिल्लक राहिलेले नाही. तर बामनोली पासून खाली भिंतीच्या बाजूला आंबवडे कारगाव नजीक नदीपात्रामध्ये होड्या चालतील एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. ज्या भागात पाणीसाठा बऱ्यापैकी प्रमाणात आहे त्या ठिकाणी या भागातील स्थानिक नागरिकांना बोटिंगची आणि मासेमारी करण्याची परवानगी नाही. अशा कुसावडे मालदेव ते कोयना धरणाची भिंत या परिसरात थोड्याफार प्रमाणात पाणीसाठा आहे.

ज्या परिसरामध्ये वर्षभर बोट व्यवसाय चालतो त्या संपूर्ण परिसरातील नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. आता पावसाळा सुरू होणार या भीतीने कोरड्या नदीपात्रात उभ्या केलेल्या बोटी प्लास्टिक कागदाने झाकून ठेवण्यासाठी बोट चालकांनी गडबड सुरू केली आहे. तर काहींनी महिनाभरापासून बोटी झाकून ठेवले आहे. मात्र या संपूर्ण परिसरातील बोट चालक आभाळाकडे डोळे लावून एकटक पाहत बसला आहे. कधी एकदाचा मान्सून राजा बरसायला सुरुवात होते. कधी एकदा कोयनेचे नदीपात्र पूर्ववत होते. याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. याच बोट व्यवसायाला जोड धंदा म्हणून बऱ्याच बोट चालकांनी हॉटेल, टेन्ट, अग्रो टूरिजम व्यवसाय असे व्यवसाय सुरू केले आहेत मात्र बोटिंग पूर्णपणे बंद झाल्याने हॉटेल व्यवसाय देखील संकटात आला आहे अशा दुहेरी संकटात येथील बोट व हॉटेल व्यवसायिक बसले आहेत आता प्रतीक्षा आहे ती मुसळधार कोसळधार पावसाची.

हेही वाचलंत का?

Back to top button