अफगाणिस्तान मधील तालिबानी क्रौर्याची भीती; उद्या काय होणार .. | पुढारी

अफगाणिस्तान मधील तालिबानी क्रौर्याची भीती; उद्या काय होणार ..

मडगाव; विशाल नाईक : अफगाणिस्तान मधील सध्याच्या भयानक परिस्थितीमुळे गोव्यात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालिबानी क्रूर राजवट आम्ही अनुभवली आहे. आजचा दिवस सरला आहे, पण उद्या काय होणार हे कोणालाच माहिती नाही. आई-वडिलांना भेटण्याची तीव्र इच्छा होत आहे, पण जाता येत नाही. अशा कठीण स्थितीत गोव्यातील एका महाविद्यालयात पदवी शिक्षण घेणार्‍या मूळ अफगाणिस्तानचा मोहम्मद जहीर खल्लोली हा विद्यार्थी अडकून पडला आहे.

अफगाणिस्तानवर सध्या तालिबानने कब्जा मिळविला आहे. यापूर्वी अफगाणमध्ये अशरफ घनी यांचे सरकार होते, तेव्हा भारताशी अनेक करार झाले होते, त्यात शैक्षणिक कराराचाही समावेश आहे. त्याच कराराच्या आधारावर अफगाणिस्तानातील अनेक विद्यार्थी गोव्यात शिक्षणासाठी दाखल झाले आहेत. अफगाणिस्तानात जी अराजकता ओढवली आहे, त्यामुळे येथील अनेक अफगाणी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून अनेक अफगाण विद्यार्थी राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. तालिबानचे सरकार स्थापन होण्याची शक्यता असल्याने भारताबरोबरचे करार मोडीत निघतील आणि या विद्यार्थ्यांच्या व्हीसा नूतनीकरणावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

मोहम्मद जहीर खल्लोली हा उत्तर अफगाणिस्तानातील रहिवासी आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून गोव्यात वास्तव्याला आहे आणि कायदा शाखेचे तो शिक्षण घेत आहे. त्याने सांगितले की, आपले आई-वडिलांशी आपले बोलणे झालेले आहे. सध्या ते सुखरूप आहेत, मात्र उद्या काय होणार याची शाश्वती नाही, असे तो भावनाविवश होऊन सांगत होता. आईला भेटण्याची इच्छा आहे पण आता जाता येत नाही. सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात कधी गावी जाता येईल, हे सांगता येत नाही, असे सांगून त्याने चिंता व्यक्त केली.

मदिना आयुबी, मोहम्मद सरवर, मारोफा मुराद हे विद्यार्थी मित्र त्यांना येथील शिक्षण पद्धती आवडली नाही, त्यामुळे ते सहा महिन्यांपूर्वी गोवा सोडून पुन्हा अफगाणिस्तान मध्ये परतले. आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांचा संपर्क होत नाही.
-मोहम्मद जहीर खल्लोली, विद्यार्थी

Back to top button