कोरोना केअर सेंटर मधून कुर्डूवाडीत १४ रुग्ण पळाले | पुढारी

कोरोना केअर सेंटर मधून कुर्डूवाडीत १४ रुग्ण पळाले

कुर्डूवाडी; पुढारी वृत्तसेवा : कुर्डूवाडी येथील श्रीराम मंगल कार्यालयातील कोरोना केअर सेंटर मधून 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेले आहेत. या प्रकारामुळे कुर्डूवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत प्राथमिक आरोग्यसेवक दत्तात्रय मल्‍लिकार्जुन कांबळे (वय 27, रा. भोसरे) यांनी कुर्डूवाडी पोलिसांत पळून जाणार्‍या रुग्णांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुर्डूवाडीलगत असलेले हे शासकीय कोरोना उपचार केंद्र 100 रुग्ण क्षमतेचे आहे.

सध्या यात 98 रुग्ण उपचार घेत आहेत. या केंद्रावर एक डॉक्टर व एक परिचारिका सकाळी व रात्री असे सेवा देत आहेत.सकाळी 10 व रात्री 10 नंतर अशा दोन वेळा रूग्णांची तपासणी करून उपचार केले जातात. यादरम्यान रुग्णांची नोंद पुस्तिकेत घेतली जाते.

दरम्यान 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट यादरम्यान उपचार घेत असलेले नाडी (ता. माढा) येथील तीन, बादलेवाडी (ता. माढा) येथील एक, पिंपळनेर (ता. माढा) येथील दोन, कुर्डू (ता. माढा) येथील एक, पिंपळखुंटे (ता. माढा) येथील दोन, पडसाळी (ता. माढा) येथील पाच, तडवळे (ता. माढा) येथील एक रुग्ण उपचारादरम्यान मागच्या दाराने पळून गेल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. माढा तालुक्यात होमक्वारंटाईनसाठी परवानगी न दिल्याने हे रुग्ण पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शिराळ (मा) (ता. माढा) येथील सहा कोरोना संक्रमित व्यक्तीनींही कोरोना केअर सेंटर येथे जाण्यास नकार दिला. त्यामुळे शिराळ येथील ग्रामसेविका मीनाक्षी हिरदास रामगुडे (वय 31) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या आणि कोरोना सेंटरवर येण्यास नकार देणार्‍या सर्वांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी दिली.

Back to top button