कसा लागला अत्तराचा शोध? | पुढारी

कसा लागला अत्तराचा शोध?

नवी दिल्ली : सुगंधी द्रव्ये मनाला प्रसन्न करीत असतात. देवघरात लावलेल्या अगरबत्तीपासून ते कपड्यांवर फवारलेल्या परफ्यूमपर्यंत अनेक सुगंधी द्रव्यांचा माणूस वापर करीत असतो. सुगंधी अत्तराचा प्रवास कुठून सुरू झाला असावा याचेही अनेकांना कुतुहल वाटते. अर्थातच याबाबत अनेक मतमतांतरे आहेत.

शेतीसाठी जंगले जाळताना यापैकी अनेक वनस्पती जळाल्यानंतरही सुगंध पसरवतात हे माणसाला ठाऊक झाले होते. मात्र, अशा वनस्पतींपासून अत्तर कसे बनवायचे याचा शोध तसा उशिराच लागला.

काही अभ्यासकांच्या मते, प्राचीन बॅबिलॉनमधील एका स्त्री रसायनशास्त्रज्ञाने असे अत्तर सर्वात प्रथम बनवले. मेसोपोटेमियातील या स्त्रीचे नाव होते ताप्पुती. तिने आधी तेल आणि सुगंधी फुले यांच्या मिश्रणातून पहिले अत्तर बनवले असे मानले जाते.

ताप्पुती ही मेसोपोटॅनियम संस्कृतीमधील ही एक प्रभावी व्यक्ती होती. तेथील एका शिलालेखातही तिच्या नावाचा उल्लेख सापडतो. सध्याच्या इराकमधील भागात ही संस्कृती नांदत होती. ताप्पुती ही मेसोपोटॅनियाच्या राजघराण्यातील दासींची प्रमुख होती.

फुलांमधून अर्क कसा काढून घ्यायचा याचे प्राथमिक तंत्र तिनेच शोधले. त्यानंतर अनेकांनी त्यामध्ये भर घातली. भारतातही इसवी सन 3500 ते 1300 पर्यंत म्हणजे सिंधू संस्कृतीच्या काळात अत्तर बनवले जात असे. त्यासाठी फुले, सुगंधी वनस्पती आणि कस्तुरीचा वापर केला जात होता.

Back to top button