कास पठारावरती बहरतोय विविध रानफुलांचा रंगोत्सव | पुढारी

कास पठारावरती बहरतोय विविध रानफुलांचा रंगोत्सव

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जागतिक वारसास्थळ म्हणून असलेल्या कास पठारावर विविध रानफुलांचा रंगोत्सव सध्या सुरू झाला आहे. विविध फुलांच्या कळ्या उमलल्या असून पुढील 15 दिवसांत पठार विविध फुलांनी बहरणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पर्यटनाला परवानगी दिल्यानंतर यंदा कासचा हंगाम दि. 1 सप्टेंबर रोजी सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याबाबत बुधवारी बैठक होणार असून त्यामध्ये याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.

गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून जिल्हा लॉकडाऊन आहे. या कालावधीत पर्यटनाला बंदी घालण्यात आली होती. मात्र, सातार्‍याचा पॉझिटिव्ह रेट 6 टक्क्यांवर आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी निर्बंध शिथील केले. यामध्ये पर्यटनालाही परवानगी देण्यात आली आहे.

या पार्श्‍वभूमीवर महाबळेश्‍वर-मधील सर्व पॉईंटस् खुले करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळेही खुली झाल्याने कासचा यंदाचा हंगाम सुरू करण्यासाठी उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. हंगाम सुरू करण्यासाठी नोंदणीपासून ते पार्किंगपर्यंत नियोजन करण्याची जबाबदारी कास संयुक्‍त वनव्यवस्थापन समितीची आहे. याबाबत बुधवारी महत्वाची बैठक होणार आहे.

जावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रंजनसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत पदाधिकारी निवडीसह हंगाम नियोजनावर चर्चा होणार आहे. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर कासवरील फुले नागरिकांना पहावयास मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कास पठारावर पावसाळा सुरू झाला की विविध रंगी फुलांच्या प्रजाती अंकुरू लागतात. हळूहळू रंगीबेरंगी फुलांचा बहर वाढत जात असतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात रानफुलांचा बहर मोठ्या प्रमाणात येत असतो. ही रानफुले विविध प्रकारची रंगीबेरंगी असतात. हिरव्यागार गालिच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वार्‍याची झूळुक आणि डोलणारी पांढरी विविधरंगी फुले अक्षरश: मन मोहून टाकत असतात. यांचे वैशिष्ट म्हणजे दर 15 दिवसांनी त्यांचे रंग बदलत असतात.

काही फुले दरवर्षी येत असतात तर काही टोपली कारवीसारखी फुले दर सात वर्षांनी येत असतात. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून कासवर विविध फुलांचा रंगोत्सव साजरा होत असतो.

कोरोनामुळे गेल्या दीडवर्षापासून पर्यटनावर प्रशासनाने बंदी घातली आहे. गतवर्षी कास पठारावर पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे संयुक्त व्यवस्थापन समितीला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. कास पठाराच्या फुलांच्या हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक छोटे मोठे व्यावसायिक अवलबूंन आहेत. मात्र, या व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली. तसेच गतवर्षापासून पठारावर पर्यटकांचा वावर कमी राहिल्याने यावर्षी पठारावर विविध प्रकारची फुले बहरण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात विविध रंगी फुले बहरू लागल्यानंतर स्थानिक पर्यटकांसह परदेशी पर्यटकांचा ओढा राहण्याची शक्यता आहे.

या फुलांचे होवू लागले दर्शन

कास पठारावर रानहळद, जंगली आले, सातारी तुरा(वायुतूरा), कपरू(बिगेनिया), आषाढ आमरी, कंदील पुष्प, सफेद मुसळी, नागफणी, रानतंबाखू, झाडावरील आर्किड, भुईचक्र, रानवांगी, रामटा, बिबळा आर्किड पांचगणी आमरी, स्पंद, चवर (पांढरी हळदी), निसुरडे, आभाळी, नभाळी, कुमुदिनी, दीपकाडी, सोनकी,गवेली अशी तुरळक फुलांचे दर्शन होवू लागले आहे.

कास हंगाम सुरू करण्याबाबत कास वनव्यस्थापन समिती सकारात्मक आहे. त्या अनुषंगाने फुले उमलल्यानंतर हंगाम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार बुधवारी बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय होणार आहे.
– महादेव मोहिते,
उप वनसंरक्षक, सातारा

Back to top button