मलेरिया वरील औषधही कोरोनावर प्रभावी? | पुढारी

मलेरिया वरील औषधही कोरोनावर प्रभावी?

लंडन : ‘कोव्हिड-19’ वरील प्रभावी उपचार शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे. ही ट्रायल मलेरिया, ल्युकेमिया तसेच संधीवाताच्या ऑटोइम्युन डिसीजसारख्या आजारांवरील औषधांवर केली जात आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की या आजारांमध्ये वापरण्यात येणारी अँटी-इन्फ्लेमेट्री औषधे संक्रमणानंतर अनियंत्रित होणार्‍या रोगप्रतिकारक शक्तीला नियंत्रित करतात. या औषधांच्या माध्यमातून ‘कोव्हिड’वरील स्वस्त आणि परिणामकारक उपचार शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘फ्रंटियर्स इन इम्युनोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांनी म्हटले आहे की कोरोना संक्रमणानंतर अनेक रुग्णांमधील रोगप्रतिकारक यंत्रणा अनियंत्रित होऊन ती शरीरावरच हल्ले करू लागते. याचा अर्थ ती अतिसक्रिय होऊन विषाणूशी लढण्याबरोबरच शरीरातील पेशींचेही नुकसान करू लागते.

अशावेळी रुग्णाच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊ शकतात आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. वैज्ञानिक भाषेत या स्थितीला ‘सायटोकाईन स्टॉर्म’ असे म्हटले जाते.

तज्ज्ञांच्या एका पॅनेलने या तीनही प्रकारच्या औषधांना यासाठी निवडले जेणेकरून ‘कोव्हिड’पासून होणारे मृत्यू रोखले जातील. या ट्रायलला ‘सॉलिडेरिटी प्लस’ असे नाव देण्यात आले आहे. 52 देशांच्या 600 रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांवर ही चाचणी घेतली जाईल.

Back to top button