आपली अटक बेकायदेशीर, केतकी चितळेची मुंबई हायकोर्टात नवी याचिका | पुढारी

आपली अटक बेकायदेशीर, केतकी चितळेची मुंबई हायकोर्टात नवी याचिका

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयात नवीन एक याचिका दाखल केली आहे. त्यात तिने आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिला १५ मे रोजी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात तिला न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

दरम्यान, केतकीने कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी वकीलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर याआधी ठाणे सत्र न्यायालयाने आपला निर्णय देत केतकीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. केतकीवर दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामुळे तिचा जामीन नामंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Back to top button