विधानपरिषद आमदार नियुक्ती : एकनाथ खडसेंमुळे यादी रखडली? | पुढारी

विधानपरिषद आमदार नियुक्ती : एकनाथ खडसेंमुळे यादी रखडली?

मुबंई,पुढारी ऑनलाईन : विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. (विधानपरिषद आमदार नियुक्ती) या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीचे नेते आमने-सामने आले आहेत. मात्र, या नियुक्त्या रखडण्यामागे एकनाथ खडसे यांचे नाव यादीत असण्याचे मुख्य कारण आहे.

एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले असून देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जहरी टीकाही केली आहे. भाजप सोडण्याआधी त्यांची पुरती कोंडी केल्याने ते भाजपचे सध्या कठोर टीकाकार आहेत. त्यामुळे खडसे यांच्या नावाला संमती देण्यावरून राज्यपालच संभ्रमात असल्याचे सांगितले जाते.

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तीन पक्षांच्या १२ सदस्यांची नावे राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी पाठविली होती. मंत्रिमंडळ बैठकीत ही नावे मंजूर करून तसा प्रस्ताव राजभवनात पाठविला होता.

मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तो थंड बस्त्यात ठेवला आहे. याबाबत माहिती अधिकारात माहिती मागविण्यात आली त्यावेळी या प्रस्तावाची फाईल सापडत नसल्याचे सांगण्यात आले.

यावरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी‘राजभवनात भुताटकी आहे, त्यांनी फाईल गायब केली’ अशी उपहासात्मक टीका केली. महाविकास आघाडीचे सर्वच नेते जेथे संधी मिळेल तेथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करतात.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोवर राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्त्या करत नाही तोवर विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्त्या करणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगिल्यानंतर गदारोळ झाला होता.

तर उत्तराखंडच्या दौऱ्यावर निघालेल्या राज्यपालांना थेट विमानातून उतरवल्यानेही गदारोळ झाला होता.

नियुक्त्याच वादाचा मुद्दा

सध्या महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष सुरू आहे.

मात्र, मूळ मुद्दा आहे तो आमदारांच्या नियुक्तीचा. राज्यपाल हेतूपूर्वक या नियुक्त्या रखडवत आहेत. असा प्रचार महाविकास आघाडी करत आहे.

तर राज्यपालांच्या अधिकारात ढवळाढवळ करू नये असे भाजप सांगत आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिल्लीवारी

आमदार नियुक्तीचे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर त्याचा काय निर्णय येतो, याकडे लक्ष लागले होते.

उच्च न्यायालयाने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा सूचना केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीला गेले.

त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी अजून किती काळ नियुक्त्या प्रलंबित ठेवू शकतो किंवा नियुक्तीला मान्यता देण्याबाबत चर्चा केल्याचे समजते.

एकूणच केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यावर या नियुक्त्या रखडवल्या जात आहेत या महाविकास आघाडीच्या आरोपाला धार येत आहे.

एकनाथ खडसे यांच्या नावावर खल

विधानपरिषद आमदार नियुक्ती मुद्द्यावरून राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद नेमका काय आहे याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून एकनाथ खडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शे्ट्टी यांची नावे दिली आहेत.

हे दोघेही भाजपवर सडकून टीका करतात. विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांचे निकटवर्तीय सदाभाऊ खोत आणि शेट्टी यांचे हाडवैर आहे.

त्यामुळे शेट्टी यांची नियुक्ती होणे हे एकप्रकारे फडणवीस यांना शह आहे.

तसेच एकनाथ खडसे यांच्या नियुक्तीला भाजपमधूनच मोठा विरोध आहे.

एकनाथ खडसे यांना विधानसभेला तिकिट नाकारण्यात केंद्रीय नेतृत्वाची मोठी भूमिका होती.

त्यामुळे आता त्यांच्या नावाला मंजुरी कशी द्यायची याबबत भाजपमध्ये मोठा खल सुरू आहे. एकनाथ खडसे यांना आमदारकी देणे म्हणजे सभागृहात दोन पावले माघार आल्यासारखे आहे.

त्यामुळे त्याबाबत अमित शहा यांच्याशीच चर्चा केल्याचे समजते.

निर्णयाची शक्यता

उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता राज्यपालांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. जर निर्णय घेतला नाही तर कोर्टाची अवमानना होऊ शकते.

शिवाय राज्यात राज्यपालांच्या एकूण भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. ही चर्चा भाजपच्या प्रतिमेला तडे देणारी आहे.

त्यामुळे तातडीने निर्णय घेण्याचा दबाव राज्यापालांवर आहे. यासाठी राज्यपालांची दिल्लीवारी झाल्याचे समजते.

इच्छुकांना आशा

राजभवनातील घडामोडींमुळे आता इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील, प्रवक्ते सचिन सावंत, शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे-पाटील तर राष्ट्रवादीकडून माजी खासदार राजू शेट्टी आणि एकनाथ खडसे यांची नावे पाठविली आहेत.

हेही वाचा: 

पहा व्हिडिओ: विमानाला लटकून जाणारे दोघेजण कोसळले

Back to top button