‘खाकी’ आणि ‘खादी’मुळे या अधिकाऱ्याची ६ वर्षांत ७ वेळा बदली | पुढारी

‘खाकी’ आणि ‘खादी’मुळे या अधिकाऱ्याची ६ वर्षांत ७ वेळा बदली

सातारा, विठ्ठल हेंद्रे: पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे या अधिकाऱ्याची सांगलीसाठी बदली झाली असून ६वर्षांपूर्वी ते जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर त्यांची जिल्हा अंतर्गतच तब्बल ७वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली. त्यांच्या कारकीर्दीत दोन ठिकाणी खादीसोबत तर एका ठिकाणी खाकी नडली मात्र ते ‘स्ट्रेट’च राहिल्याने त्यांच्या बदलीचा सिलसिला कायम राहिला.

पोनि अण्णासाहेब मांजरे २०१५ मध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुका पोलिस ठाण्यात ते रुजू झाले.

दुसर्‍या वर्षी इलेक्शनवेळी त्यांचे खादीसोबत खळ्ळखट्याक झाले. लोकप्रतिनिधींना मदत करताना त्यांच्याविरुद्धही तक्रार आल्याने त्यांनी कोणताही मुलाहिजा न ठेवता तक्रारदाराची तक्रार घेतली.

यामुळे ‘खादी’ रुसली व त्यातूनच पोनि मांजरे यांच्या पोस्टिंगवर बालंट आलं. तेथून त्यांची उचलबांगडी पाटण येथे झाली.

मात्र कराड शेजारीच पाटण असल्याने ‘शेजारी’ नको, यासाठी त्यांची बदली पोलिस मुख्यालयात करण्यात आली.

काही कालावधीसाठी पोलिस मुख्यालयात बदली झाल्यानंतर प्रकृती अस्वस्थामुळे ते आठ महिने सीकमध्ये राहिले.

पहिल्या व दुसर्‍या ठिकाणी खाकीचा सामना केल्यानंतर पोनि अण्णासाहेब मांजरे यांची फलटण येथे तिसर्‍या ठिकाणी बदली करण्यात आली.

याठिकाणी एका ‘मॅटर’मध्ये भागातील अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याने त्यांनी आपल्या पार्टीच्या माणसासारखे काम झाले पाहिजे असा आदेश सोडला.

पोनि मांजरे यांनी तक्रार व घटना हे पाहिल्यानंतर त्यामध्ये योग्य सुवर्णमध्य काढला.

मंत्रालयातील हस्तक्षेप

मात्र ही बाब मंत्रालयातील ‘खाकी’ला खटकल्याने पोनि मांजरे यांची फलटण येथून बदली करण्यात आली व तेथून ते सातारा तालुका पोलिस ठाण्यात हजर झाले.

सातारा तालुका पोलिस ठाण्यात बदली झाल्यानंतर इलेक्शन व त्यांचा जिल्ह्यातील कालावधी यामुळे तांत्रिक कारणास्तव त्यांना इलेक्शनसाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले.

सातार्‍यात आल्यानंतर त्यांचा मूळ ठिकाणी हक्क होता. मात्र वरिष्ठ जोपर्यंत कोणताही निर्णय देत नाहीत तोपर्यंत ते पुन्हा मुख्यालयात थांबले.

जिल्ह्यातील पोलिस ठाणी पॅक असल्याने त्यांना सायबर पोलिस ठाण्याचा कार्यभार देण्यात आला.

याठिकाणी एक महिना कर्तव्य बजावल्यानंतर मार्च 2019 मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात वर्णी लावण्यात आली.

शहर पोलिस ठाण्यात बदली झाल्यानंतर अखेर 16 ऑगस्ट 2021 रोजी त्यांची सांगली येथे बदली झाली.

पोनि सुर्वेनंतर पोनि मांजरे..

सातारा जिल्ह्यात यापूर्वी २०११ते २०१५ पर्यंत पोनि संजय सुर्वे जिल्ह्यात होते. साधेसरळ पोलिस अधिकारी अशी त्यांची ओळख.

कोणी गॉडफादर नसल्याने ‘कमी तिथे सुर्वे’ यानुसार या अधिकाऱ्याची ४ वर्षांत त्यांची तब्बल ७ वेळा ठिकठिकाणी जिल्हा अंतर्गत बदली झाल्याचे वास्तव आहे. दरम्यान, दोघांचेही एकाच जिल्ह्यात सातवेळा बदली होण्याचे रेकॉर्ड झाले आहे.

डीबी ‘बांधणीत’ मोठे योगदान..

पोनि अण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखा (डीबी) बांधण्याचे मोठे काम केले आहे. जुन्या एक, दोन पोलिसांसह यंग पोलिस अशी टीम करुन त्यांना गुन्हे कसे उघडकीस आणायचे.

घटनेनंतर कोणती माहिती घ्यायची तपास कसा लावायचा असे बारकाव्यांचे बाळकडू देण्याचे काम मांजरे यांनी केले.

अशाच पद्धतीने सातारा शहर पोलिसांची डीबीही सशक्त केली. आज या दोन्ही ठिकाणची डीबी ‘रिझल्ट ओरिएंटेड’ काम करत आहे.

हेही वाचा: 

पहा व्हिडिओ: अफगाणिस्तानमध्ये उडत्या विमानातून दोघे कोसळले

Back to top button