जालना : मराठवाड्यातील वॉटर ग्रीडची ठाकरे सरकारकडून हत्या; फडणवीसांचे टीकास्त्र | पुढारी

जालना : मराठवाड्यातील वॉटर ग्रीडची ठाकरे सरकारकडून हत्या; फडणवीसांचे टीकास्त्र

जालना; पुढारी वृत्तसेवा : जनतेच्या समस्या सरकार सोडवणार नसेल तर त्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. या सरकारला सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणं नाही. सरकारचे पाणी प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले असून, मराठवाड्यातील वॉटर ग्रीडची ठाकरे सरकारने हत्या केल्याची टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. जालना येथे सुरू असलेल्या जल आक्रोश मोर्चात ते बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महणाले, पाण्याबाबत जनतेच्या मनात असलेली नाराजी भाजपने काढलेल्या मोर्चात दिसून येत आहे. आपण मुख्यमंत्री असताना 129 कोटीची योजना जालन्यासाठी मंजूर झाली होती. परंतु गेल्या दोन वर्षात योजनेची अंमलबजावणी न झाल्यामुळे शहराचा पाणी प्रश्न रखडला आहे. जालन्याची अवस्था धरण उशाशी असूनही जनता मात्र पाण्यासाठी भटकंती करत आहे. शहरात १५, १५ दिवस पाणी येत नाही. ही लाजीरवाणी बाब आहे.

भाजप सरकार गेले आणि पाणी टंचाईला सुरूवात झाली. केंद्राने पाण्यासाठी दिलेला निधी राज्याने खर्च केला नाही. महाविकास आघाडीच्या या नाकर्तेमुळेच हे पाण्याचे संकट ओढावले आहे. अडीच वर्षात या सरकारकडून तसूभरही योजना पुढे गेल्या नाहीत. यामुळेच सरकारला जागं करण्यासाठीच हा जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला असून ठाकरे सरकारला याची दखल घ्यावीच लागेल, असेही मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

Back to top button