कोल्हापूर : बापानेच मुलीला पुलावरून ढकलले? मृतदेह कर्नाटकात | पुढारी

कोल्हापूर : बापानेच मुलीला पुलावरून ढकलले? मृतदेह कर्नाटकात

कोल्हापूर / कुरूंदवाड ; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड (ता. शिरोळ) येथून बेपत्ता झालेल्या साक्षी दशरथ काटकर (वय 17) हिचा मृतदेह कल्लोळ (ता. चिकोडी) येथील दूधगंगा नदीच्या पात्रात सोमवारी सापडला. दरम्यान, मुलगी सासरी नांदत नसल्याने बापानेच मुलीला दानवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीच्या पुलावरून ढकलून दिल्याची चर्चा होती.

त्यामुळे या संशयावरून दशरथ काटकर याला कुरूंदवाड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, हा खून की आत्महत्या, हे अस्पष्ट असून याबाबत उलटसुलट चर्चा आहे.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चार दिवसांपूर्वी साक्षी बेपत्ता झाल्याची फिर्याद दशरथ काटकर यांनी कुरूंदवाड पोलिसांत दिली होती. याबाबत दत्तवाड परिसरात स्वत:च्या बापानेच मुलीला पुलावरून ढकलून दिल्याच्या चर्चेवरून तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी बाप दशरथ याला ताब्यात घेतले होते.

त्यानंतर सोमवारी वजीर रेस्क्यू फोर्सकडून दोन यांत्रिक बोटींद्वारे दानवाडपासून मांजरी परिसरात शोध घेतला असता, सोमवारी कर्नाटकातील कल्लोळ येथील दूधगंगा नदीच्या पात्रात साक्षीचा मृतदेह आढळून आला.

कुरूंदवाड पोलिस दशरथ याची सखोल चौकशी करीत आहेत. त्यामुळे ही घटना खून की आत्महत्या, हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे. मुलगी अल्पवयीन असताना लग्न झाले आहे. दुसरीकडे, सासरी नांदण्यासाठी वडिलांचा जाच व यातून झालेली ही घटना, विषयाला बगल देणारी आहे. त्यामुळे दशरथ काटकर यांच्या चौकशीनंतरच दुहेरी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Back to top button