मनीष काळजे यांच्यावर प्राणघातक हल्ला : सातजणांवर गुन्हा दाखल | पुढारी

मनीष काळजे यांच्यावर प्राणघातक हल्ला : सातजणांवर गुन्हा दाखल

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतील अंतर्गत वर्चस्व वादातून युवा सेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, बाजार समिती संचालक प्रकाश वानकर, दत्तात्रय वानकर यांच्यासह सातजणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी (14 ऑगस्ट) रात्री नऊच्या सुमारास घडली.

जखमी मनीष काळजे यांनी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. काळजे हे शनिवारी (दि. 14) रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या देगाव येथील शेतातून चारचाकी वाहनातून सोलापूरकडे परतत होते. यावेळी त्यांच्यासमवेत चालक गोरखनाथ कोळी हा होता. देगाव रोडवरील इंद्रधनू अपार्टमेंट येथे आल्यानंतर पाठीमागून हॉर्न वाजवत गाडी क्रमांक एमएच 13/0550 ही गाडी आली.

पाठीमागून आलेल्या गाडीने काळजे यांच्या चारचाकी गाडीस ओव्हरटेक केले. ही गाडी प्रकाश वानकर चालवत होते. या गाडीतूनच प्रकाश वानकर यांनी काळजे यांना खाली उतरण्याचा इशारा केला, मात्र काळजे गाडीच्या चारही काचा बंद करून गाडीमध्येच बसून राहिले. यावेळी प्रकाश वानकर हे गाडीतून उतरून काळजे यांच्या गाडीजवळ आले.

काळजे यांच्या गाडीच्या काचांवर जोरजोरात मारून मोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. आज तू मला सापडला आहेस, तुला सोडणार नाही म्हणून मोठ्याने ओरडू लागले.काळजे यांनी गाडीतून उतरून प्रकाश वानकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र वानकर यांनी काळजे यांची मानगूट पकडून मारहाण करण्यास सुरूवात केली.

देगावमध्ये तू आमच्या दुश्मनासोबत फिरतोस, तुझ्या मदतीला आज कोण येतो तेेच बघतो, असे म्हणून परत काळजे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यामुळे घाबरलेल्या काळजे यांनी सुटका करून घेत पुन्हा गाडीमध्ये जाऊन बसत गाडी लॉक करून घेतली. तेवढ्या वेळेमध्ये दत्तात्रय वानकर यांनी फोन करून इतर साथीदारांना बोलावून घेतले. यावेळी वानकर आणि इतर चारजणांनी पुन्हा काळजे यांच्या गाडीवर हाताने, दगडाने मारण्यास सुरूवात केली.

काळजे यांना गाडीतून बाहेर येण्यासाठी धमकावले. गाडीची काच फोडून चालक कोळी यांना मारहाण करण्यास सुरूवात केल्यानंतर काळजे यांनी गाडीचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी याठिकाणी गणेश वानकर हादेखील आला. गणेश वानकर आणि दत्तात्रय वानकर यांनी मिळून काळजे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दत्तात्रय वानकर याने त्याच्याजवळील पिस्टलसारखे दिसणारे शस्त्र काढून उलटे करून काळजे यांच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद मनिष काळजे यांनी दिली आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिवसेना निरीक्षक हे सोलापूर दौर्‍यावर आल्यानंतर त्यांच्यासमोरच शासकीय विश्रामगृह येथे वानकर आणि काळजे या दोन गटांतील वाद उफाळून आला होता. एकमेकांविरूध्द मोठमोठ्याने घोषणाबाजी यावेळी करण्यात आली होती. यानंतर 18 ते 20 दिवसांमध्ये मारहाणीची घटना घडली आहे.

Back to top button