धनंजय महाडिक विजयी झाले अन् पराजयाचे 'ग्रहण' सुटले... | पुढारी

धनंजय महाडिक विजयी झाले अन् पराजयाचे 'ग्रहण' सुटले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

विधान परिषद निवडणुकीत झालेला पराभव, यानंतर २०१९ लोकसभा आणि विधानसभा  निवडणुकीतील अपयश, त्‍या पाठाेपाठ ‘गाेकुळ’ निवडणुकीतही सुरुच राहिलेली पराभवाची मालिका यामुळे  कोल्हापुरातील महाडिक गटाला पराभवाचे जणू  ग्रहण लागले हाेते. गेल्या चार वर्षांमध्ये  महाडिक गटाला सातत्‍याने पराभवाचा सामना करावा लागला हाेता. अखेर राज्‍यसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांनी मैदान मारलं आणि दीर्घ प्रतिक्षेनंतर महाडिक गटाने विजयाचा गुलाल उधळला.

मागील काही वर्षांमध्‍ये महाडिक गटाला सातत्‍याने पराभवाचा सामना करावा लागला हाेता. विधान परिषद निवडणुकीत महादेवराव महाडिक, त्‍यानंतर  लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक तर विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांचा पराभव झाला. यापाठाेपाठ गोकुळ दूध संघाच्‍या निवडणुकीतही पराभवाची मालिका सुरुच राहिली. २०२२मध्‍ये काेल्‍हापूर उत्तर मतदारसंघातील पाेटनिवडणुकीत सत्यजित कदम  हेही विजयापासून वंचित राहिले. सततच्‍या अपयशामुळे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण होते.

महाडिक गटाला मिळणार पुन्‍हा उभारी

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार हे विजयी होतील, असे चित्र हाेते. मात्र भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना ४१ मते मिळवत अखेर बाजी मारली. धनंजय महाडिक यांच्या राज्यसभा निवडणुकीतील विजयाने अखेर कोल्हापुरातील महाडिक गटाला नवसंजीवनीच मिळाल्‍याचे मानले जात आहे.

स्टुडंटस् कौन्सिल ते राज्यसभा

धनंजय महाडिक विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रिय आहेत. स्टुडंटस् कौन्सिलच्या निवडणुकीत ते कायम सक्रिय राहिले. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून त्यांनी संघटन करण्यास सुरुवात केली. संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी युवा शक्तीच्या शाखा काढून आपली ताकद निर्माण केली.

सन 2004 मध्ये त्यांनी प्रथम शिवसेनेच्या वतीने लोकसभेची निवडणूक लढविली; परंतु, त्यांना यश आले नाही. सन 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सन 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली. या निवडणुकीत मोदी यांची प्रचंड लाट असतानाही ते विजयी झाले हाेते; परंतु, सन 2019 च्या निवडणुकीत ही जागा महाडिक यांना राखता आली नाही.

महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील राजकीय ईर्षा टोकाला गेल्यामुळे महाडिक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेल्या पाच वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली. या विजयाने महाडिक दुसर्‍यांदा खासदार बनले आहेत.

पाटील आणि महाडिक गटातील संघर्ष पुन्हा पेटणार

कोल्हापूर उत्तर विधानसभा पाेटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव विजय झाला होता. या निवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील यांची ताकद वाढली होती. आता राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजय झाल्‍याने महाडिक गटाला बळ मिळाले आहे. त्‍यामुळे कोल्हापुरात आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्‍ये पुन्‍हा एकदा पाटील विरुद्ध  महाडिक गटातील संघर्ष पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

 

Back to top button