सांगली : उमदी येथील वृद्ध चुलतीचे अपहरण करून कर्नाटकात खून | पुढारी

सांगली : उमदी येथील वृद्ध चुलतीचे अपहरण करून कर्नाटकात खून

जत; पुढारी वृत्तसेवा : उमदी (ता. जत) येथील वृद्ध चुलतीचे अपहरण करण्यात आले. नंतर कर्नाटकातील कोलार येथे नेऊन कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुसलाबाई राजाराम माने (वय ७४) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

वृद्ध चुलतीचे अपहरण करून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चुलत पुतण्या संशयित आरोपी दादू आण्णासो माने (उमदी) यास पोलिसांनी अटक केली आहे.

चुलतीच्या अंगावरील दागिने लंपास करण्यासाठी कृत्य

वृद्ध चुलतीच्या अंगावरील दागिने लंपास करण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली संशयित आरोपी माने याने पोलिसांना दिली आहे. याबाबत वृद्धेचे जावई गणेश साळुंखे यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुसलाबाई माने यांना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास चुलत पुतण्या दादू माने याने भाड्याच्या मोटारीतून विजयपूर येथे नेले. सोबत मोटरचालकही होता. दरम्यान दादूने विजयपूरमध्ये एक कोयता विकत घेतला.

कोलार (कर्नाटक) येथे उतरून सुसलाबाई यांना पाहुण्याच्या घरी सोडून येतो, असे चालकाला थांबवून तो गेला.

त्यानंतर दोन तासांनी तो परत आला. सुसलाबाई यांना पाहुण्याच्या घरी सोडून आलो असे त्याने चालकाला सांगितले.

शर्टवर रक्ताचे डाग पडल्याने संशय

मात्र त्याच्या शर्टवर रक्ताचे डाग पडल्याचे दिसून आल्याने त्याला संशय आला. त्याने परत आल्यावर आपल्या मित्रांना ही माहिती दिली व त्यांनी चडचण येथील पोलिसांना माहिती दिली.

सुसलाबाई यांच्या जत येथील जावयाने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार उमदी पोलिसांत दिली होती. उमदी पोलिसांनी तपास गतीने सुरू केला. मोटरचालकाला बोलावून घेऊन चौकशी केली.

त्यानंतर शनिवारी कर्नाटकातील कोलार येथे जाऊन त्‍यांचा शोध घेतला असता, सुसलाबाई माने यांचा मृतदेह उसाच्या फडात सापडला.

त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे दिसून आले. संशयित दादू माने यास अटक केल्यानंतर तिच्याकडे असलेल्या सोन्याच्या हव्यासापोटी खून केल्याचे त्‍याने पोलिसांना कबुली दिली.

या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, श्रीशैल वळसंग, नितीन पलुस्कर यांनी तपास केला.

Back to top button