संजय पवार की महाडिक? : राज्यसभा निवडणुकीचा आज फैसला | पुढारी

संजय पवार की महाडिक? : राज्यसभा निवडणुकीचा आज फैसला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. मतदानानंतर लगेच तासाभरात मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल घोषित केला जाईल. या निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीचे संजय पवार (शिवसेना) आणि भारतीय जनता पक्षाचे धनंजय महाडिक या कोल्हापूरच्या दोन उमेदवारांत लढत होत आहे.

24 वर्षांनंतर राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून आघाडीसमोर आव्हान निर्माण केले आहे. हे आव्हान परतवून लावण्यासाठी महाविकास आघाडीने सज्जता ठेवली आहे. आघाडीचे आणि आघाडीला साथ देणारे आमदार भाजपच्या गळाला लागू नयेत म्हणून आघाडीने आपल्या आमदारांची पंचतारांकित बडदास्त ठेवली आहे. भाजपचे आमदारही आलिशान ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये आहेत. या सर्व आमदारांना मतदानापूर्वी विधान भवनात खास बसने आणले जाईल.

सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडी आणि भाजपकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे दोघांची मदार छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर आहे. या निवडणुकीत अपक्षांची मते निर्णायक ठरणार असल्याने त्यांना आपल्या
बाजूने खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ठाकरे हे अपक्ष आमदारांच्या तर पवार छोट्या पक्षांच्या संपर्कात आहेत. भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत. दोन्ही बाजूंकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे.

वैध मतांवर ठरणार कोटा राज्यसभेच्या सहा जागांसाठी विधानसभेतील 287 आमदार मतदानासाठी पात्र आहेत. पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी 42 मतांचा कोटा आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदान होऊन वैध मतांवर विजयी उमेदवाराचा कोटा निश्चित होईल. मतदारांना पहिल्या पसंतीचे मत देणे बंधनकारक आहे. पहिल्या पसंतीचे मत नसेल तर मतपत्रिका अवैध ठरेल. पहिल्या पसंतीनंतर मतदाराला दुसर्‍या, तिसर्‍या पसंतीची मते देता येतील. पसंतीच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार असल्याने आमदारांना मतदानाची तांत्रिक प्रक्रिया समजावून दिली जात आहे.

राज्यसभेसाठी खुले मतदान आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या आमदारांना मतदान करण्यापूर्वी आपली मतपत्रिका पक्षाने नेमून दिलेल्या प्रतिनिधीला दाखवावी लागेल. अपक्ष आमदारांना मतपत्रिका दाखवणे बंधनकारक नाही. विधानसभेतील निम्म्याहून अधिक सदस्य राज्यसभेसाठी पहिल्यांदा मतदान करणार आहेत.

कोरोनाबाधित आमदारांसाठी विशेष व्यवस्था कोरोनाबाधित आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आमदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या एक तास अगोदर मतदान करता येईल. त्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार कोरोनाबाधित असेल तर त्यांना मतदानाला येताना पीईपी किट घालून यावे लागेल. दरम्यान, आमदारांपैकी कोण कोरोनाबाधित आहे किंवा कोण नाही याची माहिती अद्याप निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देण्यात आलेली नाही. मतदान सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होईल.

देशमुख, मलिकांच्या मतदानावर आज निर्णय

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी देण्यास राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी परवानगी नाकारली. त्या विरोधात दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी मतदानाची वेळ संपण्यापूर्वीच निकाल अपेक्षित आहे.

पक्षनिहाय उमेदवार

भाजप : पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक. शिवसेना : संजय राऊत, संजय पवार. राष्ट्रवादी काँग्रेस : प्रफुल्ल पटेल. काँग्रेस : इम्रान प्रतापगढी.

Back to top button