Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडला २७ धावांची आघाडी | पुढारी

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडला २७ धावांची आघाडी

लंडन ; पुढारी ऑनलाईन: Ind Vs Eng 2nd Test कर्णधार ज्यो रूटच्या नाबाद 180 धावांच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात तिसर्‍या दिवसअखेरीस 27 धावांची नाममात्र आघाडी घेतली. त्यांचा पहिला डाव 391 धावांवर संपला. रूटने कारकिर्दीतील 22 वे शतक झळकावताना भारतीयांना पुन्हा दमवले. त्याने बेअरस्टो (57) याच्यासोबत शतकी तर जोस बटलर आणि मोईन अली यांच्यासोबत दोन अर्धशतकी भागीदार्‍या करीत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. भारताने पहिल्या डावात 364 धावांची खेळी केली होती. भारताच्या मोहम्मद सिराजने 4 विकेटस् घेतल्या. Ind Vs Eng 2nd Test

लॉर्डस्च्या मैदानावर शुक्रवारची नाबाद जोडी ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी शनिवारीही आपली दमदार खेळी पुढे सुरू ठेवली. कर्णधार रूटने आपले अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ संघाचे द्विशतकही फलकावर लागले. त्याचबरोबर या दोघांच्या भागीदारीने शतकी टप्पाही ओलांडला. उपहारापूर्वी जॉनी बेअरस्टोनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. उपहाराला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या 3 बाद 216 धावा झाल्या होत्या. पहिले सत्र संपूर्णपणे इंग्लंडच्या नावावर राहिले. भारतीय गोलंदाजांनी जंग-जंग पछाडूनही त्यांना विकेट घेण्यात यश आले नाही. Ind Vs Eng 2nd Test

उपहारानंतर कर्णधार रूट शतकाच्या उंबरठ्यावर असताना बेअरस्टोने त्याची साथ सोडली. मोहम्मद सिराजने भारताला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. 57 धावा करणार्‍या बेअरस्टोने कोहलीकडे सोपा झेल दिला. 81 व्या षटकात भारताने नवा चेंडू घेतला, पण रूटने याच चेंडूच्या साक्षीने आपले 22 वे कसोटी शतक झळकावले. भारताला दुसरे यश इशांत शर्माने मिळवून दिले. त्याने जोस बटलरचा (23) त्रिफळा उडवला. त्यानंतर चहापानापर्यंत रूट आणि मोईन अली यांनी कोणतीही पडझड होऊ दिली नाही. दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

भारतासाठी डोकेदुखी ठरलेली ही भागीदारी इशांत शर्माने मोडली. त्याने मोईन अली (27) याला कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. इशांतने पुढच्याच चेंडूवर सॅूम कुरेनला शुन्यावर बाद करुन भारताला बोनस मिळवून दिला. त्यानंतर ओली रॉबीनसन (6) आणि मार्क वूड (5) यांनी रुटला थोडीफार साथ दिली. शेवटी जेम्स अँडरसनचा त्रिफळा उडवून मोहम्मद शमीने इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. शमीने 2, इशांतने 3 तर मोहम्मद सिराजने 4 विकेट घेतल्या.

22 ज्यो रूटने कसोटी कारकिर्दीतील 22 वे शतक ठोकले. या शतकाने त्याने इंग्लंडच्या वेली हॅमोंड, कॉलीन काऊड्रे, जेफ बॉयकॉट, इयान बेल यांच्याशी बरोबरी केली आहे. रूटच्या पुढे आता केव्हीन पीटरसन (23 शतके) आणि अ‍ॅलिस्टर कूक (33) हे दोघे आहेत.

07 भारताविरुद्ध रूटचे सातवे शतक असून, सलग दुसरे शतक आहे. रूटने भारताविरुद्ध सलग 4 वेळा 50 च्या वर धावा केल्या आहेत. त्याने यापूर्वी 2018 मध्ये केनिंग्टन ओव्हल टेस्टमधील दुसर्‍या डावात 125 धावांची खेळी केली होती. तर, या मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 64 आणि 109 धावांची खेळी केली होती. Ind Vs Eng 2nd Test

भारत (पहिला डाव) : सर्वबाद 364.

इंग्लंड (पहिला डाव) : रॉरी बर्न्स पायचित गो. मोहम्मद शमी 49, डॉमिनिक सिबली झे. के. एल. राहुल गो. मोहम्मद सिराज 11, हसीब हमीद त्रि. गो. मोहम्मद सिराज 0, ज्यो रूट नाबाद 180, जॉनी बेअरस्टो झे. विराट कोहली गो. मोहम्मद सिराज 57, जोस बटलर त्रि. गो. इशांत शर्मा 23, मोईन अली झे. विराट कोहली गो. इशांत शर्मा 27, सॅम कुरेन झे. रोहित शर्मा गो. इशांत शर्मा 0, ओली रॉबिन्सन पायचित गो. सिराज 6, मार्क वूड धावचित 5, जेम्स अँडरसन त्रि. गो. शमी 0. अवांतर : 33, एकूण : सर्वबाद 391. गडी बाद क्रम : 1/23, 2/23, 3/108, 4/229, 5/283, 6/341, 7/341, 8/357, 9/371, 10/391.

गोलंदाजी : इशांत शर्मा 24-4-69-3, जसप्रीत बुमराह 26-6-27-0, मोहम्मद शमी 26-3-95-2, मोहम्मद सिराज 30-7-94-4, रवींद्र जडेजा 22-1-43-0.

पाहा व्‍हिडीओ : नागपंचमी स्पेशल : आरेच्या जंगलात साप एक थ्रिलिंग अनुभव !

Back to top button