डॉ. प्रकाश गुणे यांच्याकडून सेना दलाला १ कोटीची मदत | पुढारी

डॉ. प्रकाश गुणे यांच्याकडून सेना दलाला १ कोटीची मदत

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथील प्रसिध्द डॉ. प्रकाश गुणे यांच्या कुटुंबियांची चौथी पिढी वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे. कोल्हापुरातील पहिले युरोओलॉजिस्ट, गेली पाच दशके वैद्यकीय सेवा करत आहेत. रुग्ण तपासणी आणि वैद्यकीय सेवा यापलिकडे जावून त्यांनी विविध सामाजिक कामासाठी सढळ हातानी मदतीचा हात पुढे करतात. मदतीचा गवगवा नाही की प्रसिध्दीचा हव्यास नाही. मिळालेल्या उत्पन्नातील काही वाटा समाज, देशहितासाठी खर्च व्हावा, ही त्यांची अंतरिक भावना, याच हेतूने डॉ. प्रकाश गुणे आणि कुटुंबियांनी भारतीय सेनादलाला तब्बल १ कोटी रूपयाची देणगी दिली आहे.

सशस्त्र सेनादल, युध्दग्रस्त पुनर्वसन फंडासाठी त्यांनी ही रक्कम देणगी स्वरूपात दिली आहे. नवीदिल्ली येथे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे त्यांनी मदतीचा धनादेश सोपविला. खुद्द संरक्षणमंत्र्यांनी गुणे कुटुंबियांच्या दातृत्वाची माहिती ट्विट केली आहे. शिवाय गुणे कुटुंबियांनी केलेल्या मदतीबद्दल आनंद, कृतज्ञता व्यक्त केली आहे. या कोल्हापूरकरांच्या दातृत्वाने समाजासह दिल्लीही थक्क झालीय. अशा स्वाभाविक प्रतिक्रिया समाजमनातून उमटत आहेत.

कोल्हापूरकर डॉक्टर प्रकाश गुणे सामान्यांचे देवदूत

डॉ. गुणे, हॉस्पिटल मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी अनुराधा गुणे, मुलगा डॉ. राहूल, नातू डॉ. आयर्न गुणे यांनी शुक्रवारी दुपारी संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्याच्यासमवेत दिल्ली येथील मित्र डॉ. अमित शहा, अर्चना शहा उपस्थित होते. गुणे कुटुंब मुळचे गडहिग्लज येथील. डॉ. प्रकाश गुणे यांचे वडिल अनंत गुणे हे डॉक्टर होते. त्याचाच वैद्यकीय वारसा डॉ. प्रकाश गुणे व कुटुंब चालवित आहेत. डॉ. गुणे यांनी प्राथमिक शिक्षण गडहिग्लजमध्ये घेतले.

त्यानंतर पुण्यातील मॉडर्न स्कूल, फर्ग्युसन कॉलेज, त्यानंतरचे मेडीकलचे शिक्षण घेतले.यानंतर ते लंडनमध्ये सहा वर्षे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होते.एफआरसीएस हा अभ्यासक्रम पुर्ण केला. १९७३ मध्ये त्यांनी कोल्हापुरात वैद्यकीय सेवेला सुरूवात केली. खरी कॉर्नर परिसरात निर्मल हॉस्पिटल आहे.

कोल्हापुरातील ते पहिले मुत्रविकार तज्ञ, जवळपास पाच दशके वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. कोल्हापुरातील नामांकित डॉक्टर म्हणून परिचित आहेत. डॉ प्रकाश गुणे आज ८१ वर्षाचे आहेत. या वयातही त्यांनी सेवेत खंड पडू दिला नाही. त्यांचा मुलगा,नातू अशी चौथी पिढी आज वैद्यकीय सेवेत आहे.

गुणे कुटुंबियांचा समाजासाठी नेहमी पुढाकार

गुणे कुटुंबियांनी समाजातील विविध घटकांना लोकोपयोगी प्रकल्पांना आर्थिक मदत केली आहे. नुकतेच त्यांनी कणेरी मठ सिध्दीगिरी हॉस्पिटल येथील ऑक्सीजन प्रकल्पासाठी १ लाख ११ हजार रूपयाची मदत केली आहे.

ऑक्सीजन साठवणुकीसाठी रिकाम्या टाकीसाठी त्यांनी अर्थसहाय्य केले.

मदतीचा कधीही गाजावाजा केला केला नाही. प्रसिध्दिचा हव्यास करायचा नाही हे सुत्र त्यांनी पाळले.

याचे आदर्शवत उदाहरण म्हणजे त्यांनी सिध्दगिरी येथील ऑक्सिजन प्रकल्पासाठी लाखो रूपयाची मदत केली.

संयोजकांनी दानशूर व्यक्तींचा सत्कार ठेवला होता.मात्र डॉ. गुणे अलिप्त राहिले.

भारतीय सेनादल आणि जवान देशसेवेसाठी, देश संरक्षणासाठी अभुतपुर्व योगदान देतात.

स्वत:च्या जिवाची पुर्व न करता देशासाठी कर्तव्य बजावतात.

या सेनादलाला नागरिकत्वाच्या कर्तव्य भावनेतून मदत करावी,अशी भावना पत्नी अनुराधा गुणे यांनी व्यक्त केली.

उत्पन्नातील काही वाटा देशासाठी, समाजासाठी खर्च करावी, देशाच्या सेवेत या माध्यमातून खारीचा वाटा उचलावा,या विचारातून संबंधित रक्कमेचा धनादेश त्यांनी सुर्पुद केला.

 

Back to top button