भाजप-राष्ट्रवादीची तारेवरची कसरत; खडकवासला मतदारसंघात प्रबळ दावेदारांची जोरदार फिल्डिंग | पुढारी

भाजप-राष्ट्रवादीची तारेवरची कसरत; खडकवासला मतदारसंघात प्रबळ दावेदारांची जोरदार फिल्डिंग

पुणे : खडकवासला विधानसभा मतदार संघातील आरक्षण जाहीर झाल्याबरोबर माजी नगरसेवकांसह प्रबळ दावेदारांकडून एकापेक्षा जास्त प्रभागांमध्ये फिल्डिंग लावत दावा सांगितला जात आहे. त्यातच संपूर्ण विधानसभा मतदार संघात अनुसूचित जाती किंवा जमातीसाठी एकही जागा आरक्षित नाही. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीसह इतर पक्षांना तारेवरची कसरत करावी लागेल.

महापालिका हद्दीत ग्रामीण भागातील गावांचा समावेश झाल्याने मतदारसंघातील प्रभागांचा आकार मोठा झाला आहे. मतदार संघात महापालिकेच्या आठ प्रभागांचा समावेश आहे. यामध्ये आरक्षण सोडतीमध्ये 12 जागा खुल्या गटातील महिलांसाठी आणि उर्वरित 12 जागा खुल्या आहेत. तीन सदस्यीय प्रभाग रचना असली तरी एकाच प्रभागात अनेक नगरसेवक अडकले आहेत. त्यामुळे अनेकांनी विविध प्रभागांत दावेदारी सांगण्यास सुरुवात केली आहे.

वर्चस्व असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपाला कडव्या आव्हानाची शक्यता

प्रभाग 34 (वारजे-कोंढवे धावडे) या प्रभागात एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी तर दोन जागा खुल्या गटासाठी आहे. याठिकाणी राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक सचिन दोडके, दीपाली धुमाळ, बाबा धुमाळ, शुक्राचार्य वांजळे यांच्यासह गणेश धाडवे, किरण बारटक्के, सचिन दांगट इच्छुक आहेत, तर प्रभाग 35 (रामनगर – उत्तमनगर, शिवणे) या प्रभागातील दोन जागा खुल्या गटातील महिलांसाठी, तर एक जागा खुल्या गटासाठी आहे. या ठिकाणी माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, सायली वांजळे, संजय दोडके, अनिता इंगळे, सुभाष नाणेकर, सचिन दांगट इच्छुक आहेत.

प्रभाग 51 (वडगाव – माणिकबाग) या प्रभागात एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी, तर दोन जागा खुल्या गटासाठी आहे. याठिकाणी भाजपकडून माजी नगरसेवक श्रीकांत जगताप, हरिदास चरवड, राजश्री नवले, ज्योती गोसावी हे इच्छुक आहेत. याशिवाय राष्ट्रवादीकडून विकासनाना दांगट, शरद दबडे, मयूर वांजळे इच्छुक आहेत.

आयत्यावेळी कोलांटउड्या पहायला मिळणार; पर्वती विधानसभा मतदारसंघात विद्यमान नगरसेवकांतच सामना

प्रभाग 52 (नांदेड – सनसिटी) प्रभागात दोन जागा खुल्या गटातील महिलेसाठी, तर एक जागा खुल्या गटासाठी आहे. त्यामुळे या प्रभागातून भाजपकडून प्रसन्न जगताप आणि श्रीकांत जगताप या दोन माजी नगरसेवकांपैकी कोणा एकाला उमेदवारी मिळणार, हे पाहावे लागणार आहे. तसेच या प्रभागात दोन जागा खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित असल्याने मंजूषा नागपुरे यांचा मार्ग सुकर झाला आहे. त्याच्यासोबत भाजप ज्योती कळमकर, राजश्री नवले, नीता दांगट यांपैकी कोणाला उमेदवारी देते हे पाहावे लागणार आहे.

प्रभाग 53 (खडकवासला-नर्‍हेे) या प्रभागात दोन जागा खुल्या गटातील महिलांसाठी, तर एक जागा खुल्या गटासाठी आहे. या ठिकाणी माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षा स्वाती पोकळे, संतोष चाकणकर शिवसेनेचे नीलेश गिरमे आदींची दावेदारी असू शकते. तर, प्रभाग 54 (धायरी – आंबेगाव) या प्रभागात एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी, तर दोन जागा खुल्या गटासाठी आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका स्मिता कोंढरे, काका चव्हाण, भाजपच्या अश्विनी पोकळे निवडणूक रिंगणात असतील. प्रभाग 55 (धनकवडी-आंबेगाव पठार) या प्रभागात दोन जागा खुल्या गटातील महिलेसाठी, तर एक जागा खुल्या गटासाठी आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा राजश्री नवले, बाळासाहेब धनकवडे, अश्विनी भगत या माजी नगरसेवकांसह भूपेंद्र मोरे, पोपट खेडेकर, तानाजी दांगट हे इच्छुक आहेत.

मातब्बरांचा पत्ता कट नाही, पण उमेदवारी नेमकी द्यायची कुणाला? कोथरूडमध्ये भाजप, राष्ट्रवादीसमोर प्रश्न

प्रभाग 56 (चैतन्यनगर-भारती विद्यापीठ) या प्रभागात एक जागा खुल्या गटातील महिलेसाठी, तर दोन जागा खुल्या गटासाठी आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विशाल तांबे, युवराज बेलदरे आणि अश्विनी भगत, भाजपच्या वर्षा तापकीर या माजी नगरसेवकांची दावेदारी असणार आहे. या ठिकाणी तांबे आणि बेलदरे यांचा जरी मार्ग सुखर दिसत असला, तरी महिलेच्या जागेसाठी काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

Back to top button