पुणे : रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग ठरलेले अविनाश भोसले आहेत कोण? | पुढारी

पुणे : रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग ठरलेले अविनाश भोसले आहेत कोण?

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि एबीएल ग्रुपचे अविनाश भोसले यांना नुकतीच अटक झालेली आहे. त्यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पण, अविनाश भोसले यांचा प्रवास हा रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा झालेला आहे. चला तर हा प्रवास कसा झाला ते पाहुया…

रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा प्रवास असलेले अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरवरून पुण्यात रोजगारच्या शोधात आलेल्या भोसले यांनी सुरुवातीला रिक्षा चालक म्हणून कामाला सुरुवात केली. पुढे रिक्षा भाड्याने द्यायचा व्यवसाय केला. बांधकाम क्षेत्र आणि शासनाच्या बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून लहान मोठी कंत्राटी काम मिळवली. 1995 मध्ये सेना-भाजप युतीच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे भोसले यांना मिळाली. सर्वच पक्षातील राजकिय व्यक्तींशी जवळीक साधण्याचे कौशल्य भोसले यांच्याकडे आहे.

पुण्यातील बाणेर भागात आलिशान असा व्हाइट हाऊस बांगला त्यांनी उभारला. त्यावर स्वतःच्या मालकीची तीन हेलिकॉप्टर आहेत. त्यानंतर मात्र 2007 मध्ये अविनाश भोसले यांच्या प्रगतीला ब्रेक लागला. कस्टम विभागाने फेमा कायद्यानुसार कारवाई केली. त्यानंतर जलसंपदा घोटाळ्याचे वादळ भोसलेंभोवती घोंगाऊ लागले आणि त्यांनी मार्ग बदलला. जलसंपदा विभागातील ठेकेदारी कमी करून बांधकाम क्षेत्र, रस्ते, पूल उभारणी आणि हॉटेल व्यवसायात त्यांनी आपल्या कामाचा विस्तार वाढवला.

2017 साली आयकर विभागाने भोसलेंच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले. 2020 मध्ये ईडीच्या चौकशीचा ससेमिरा भोसलेच्या मागे लागला. अविनाश भोसले यांची ईडी आणि सीबीआयने चौकशी केली होती. तर, ईडीने फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी करत गेल्यावर्षी त्यांची संपत्ती जप्त केली होती.

Back to top button