सावधान..! वृक्षतोड पडणार महागात | पुढारी

सावधान..! वृक्षतोड पडणार महागात

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  शहरवासीयांनो सावधान..! जर तुम्ही अवैधपणे वृक्षतोड केल्यास तुमच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. वैधपणे जरी वृक्षतोड करावयाची झाल्यास तुम्हाला एका झाडाच्या बदल्यात 10 झाडे महापालिकेच्या उद्यान विभागाला द्यावी लागणार आहेत.

शहरात विनापरवाना वृक्षतोड करण्याचे प्रमाण मोठे आहे. बर्‍याच लोकांना हे माहीत नाही की, वृक्षतोड तर सोडाच साधी फांदी जर छाटावयाची असल्यास त्याकरिता मनपाच्या उद्यान विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वृक्षतोडसंदर्भात वेगवेगळ्या कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई केली जाते. अशा प्रकरणांबाबत दंड व शिक्षेची तरतूद आहे. ‘स्मार्ट सिटी’त समावेश असलेले सोलापूर स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे.

शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत आतापर्यंत हजारो वृक्ष लागवड करण्यात आली आहे. अन्य योजना तसेच लोकसहभागातूनदेखील वृक्ष लागवड केली जात आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये ओसाड शहराचा चेहरामोहरा बदलून शहर हिरेवगार करण्यासाठी चळवळच जोर धरली आहे.

हे आहेत समितीचे पदाधिकारी

वृक्षतोडसंदर्भातील अर्जांवर निर्णय घेण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना केली आहे. मनपा आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष आहेत. उपायुक्त मच्छिंद्र घोलप हे सचिव, तर उद्यान अधिकारी निशिकांत कांबळे, डॉ. एम.एन. जगताप, डॉ. एस.पी. गायकवाड, परशुराम कोकणे, श्रीनिवास यन्नम, प्रवीण तळे, अनिल पेठकर, प्रा. गजानन धरणे हे सदस्य आहेत.

हे आहे समितीचे कार्य

वृक्ष अथवा फांदीतोडसंदर्भात संबंधित नागरिक वा संस्थांना मनपाच्या उद्यान विभागाकडे अर्ज करावा लागतो. अशी प्रकरणे वृक्ष प्राधिकरण समितीकडे पाठविली जातात. समितीचे पदाधिकारी वृक्ष अथवा फांदीतोडसंदर्भात प्रत्यक्ष झाडाची पाहणी करतात. यानंतर वृक्ष़ वा फांदीतोड करण्यास परवानगी देणे अथवा न देणे याबाबत निर्णय घेतला जातो. वृक्षतोड करण्यास परवानगी मिळाल्यास संबंधित व्यक्तीला एका वृक्षाच्या बदल्यात 8 ते 10 फूट उंचीची 10 झाडे उद्यान विभागाला देणे बंधनकारक आहे.
39 प्रकरणांचा निपटारा

उद्यान विभागाकडे सध्या वृक्षतोडसंदर्भात 300 हून अधिक अर्ज आले आहेत. घराला धोकादायक ठरणारी, बांधकाम करण्यास अडथळा ठरणारी, विजेच्या तारांना स्पर्श करणारी, रहदारीस अडथळा ठरणारी आदी कारणांस्तव वृक्ष वा फांदीतोड करण्यास परवानगी मागणारे हे अर्ज असतात. मनपाकडे प्राप्त 300 पैकी 39 अर्जांचा निपटारा वृक्ष प्राधिकारण समितीच्या माध्यमातून केला आहे.

‘त्या’ व्यक्तीला 1200 वृक्ष द्यावे लागणार

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील 120 वृक्षांची अनधिकृतपणे कत्तल करण्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता. यासंदर्भात मनपाने संबंधित व्यक्तीवर फौजदारी कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण वृक्ष प्राधिकरण समितीकडे आले आहे. या व्यक्तीने 120 झाड्यांच्या बदल्यात 8 ते 10 फूट उंचीची 1200 वृक्ष उद्यान विभागाकडे जमा करावीत, असा निर्णय समितीने दिला आहे.

Back to top button