लडाख : पॅंगाॅंग त्सो तलावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम; चीनची आणखी एक कुरापत? | पुढारी लडाख

लडाख : पॅंगाॅंग त्सो तलावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम; चीनची आणखी एक कुरापत?

लडाख, पुढारी ऑनलाईन : भारतीय सीमेवरील (लडाख) चीनच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहे. आता आणखी एक कुरापत समोर आली आहे. लडाखच्या पॅंगाॅंग त्सो तलावाजवळ चीनने पूल बांधायला सुरू केली आहे. इतकंच नाही तर, हा पूल मोठा आणि मजबूत बांधण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे. त्यावरून मोठमोठी लष्करी शस्त्रं जाऊ शकतील, या दृष्टीने हा पूल बांधला जात आहे. यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र खात्याकडून सांगण्यात आलं आहे की, “हा पूल चीनच्या ताब्यात असलेल्या भूभागात उभारण्यात आला आहे.”

यापूर्वीच पॅंगाॅंग त्सो तलावजवळ एका पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. हा पूल एप्रिल महिन्यात बांधून पूर्ण झालेला आहे. उपग्रहाच्या माध्यमातून या पूलाचे छायाचित्र घेण्यात आले होते, अशा आशयाच्या बातम्या जानेवारी महिन्यात आलेल्या होत्या. मात्र, त्या पुलाच्याच बाजुला आणखी एका पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

भारतीय परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, “मागील अनेक दशकांपासून ज्या भागात बांधकाम सुरू आहे, तो भाग चीनच्या ताब्यात आहे. तिथे भारचाचे लक्ष आहे. तसेच चीनसोबत राजनैतिक आणि लष्करी पातळ्यांवर चर्चा सुरू राहणार आहे”, अशी माहिती अरिंदम बागची यांनी दिली. रुडोकमार्गे खुर्नाक येथून तलावाच्या दक्षिणेकडे जाण्यासाठी १८० किलोमीटर अंतर कापावे लागते. या पुलाच्या बांधकामामुळे ४०-५० किलोमीटरने कमी होणार आहे.

भविष्यात भारतासोबत (लडाख) संघर्ष झाला तर, तातडीने लष्करी हालचाल होऊन लष्करी रसद लवकर पोहोचावी यासाठी पूल बांधण्यात येत आहे. हा पूल ताबा रेषेपासून केवळ २० किलोमीटर अंतरावर आहे. हा पूल मोठा असून दोन्ही बाजुंनी त्याचे काम पूर्ण झालेले आहे. पहिल्यांदा लहान पूल करण्यात आला आहे. त्याचाच वापर करून मोठ्या पुलावरून लष्करी साहित्य पुरवठा करण्यासाठी होणार आहे.

पहा व्हिडीओ : ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्याशी खास गप्पा

Back to top button