आयटीआर : फॉर्म १६ नसतानाही प्राप्तिकर विवरण भरू शकतो | पुढारी

आयटीआर : फॉर्म १६ नसतानाही प्राप्तिकर विवरण भरू शकतो

श्रीकांत देवळे

आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. आपल्याकडे विशेषत: नोकरदारवर्गाकडे हा फॉर्म नसेल, तर चिंतेचे कारण नाही. फॉर्म 16 नसतानाही प्राप्तिकर विवरण भरू शकतो.

सध्याच्या काळात अडीच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न पाच लाख असेल, तर त्याला कोणताही कर भरावा लागत नाही. बहुतांश लोकांना कंपनीकडून फॉर्म 16 देखील मिळालेले नाही. यानुसार अनेक जण विविध उद्योगांच्या मार्फत उत्पन्न मिळवतात. परंतु, त्यांना फॉर्म 16 असतोच असे नाही. अशावेळी फॉर्म 16 नसेल, तर रिटर्न कसे भरावे, असा प्रश्न असतो. आता आयटीआर भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. आपल्याला अजूनही फॉर्म 16 मिळालेला नसेल, तर चिंता करू नका. या फॉर्मशिवाय रिटर्नदेखील भरू शकतो.

फॉर्म 16 ची अनिवार्यता

कोरोना काळासह अनेक कारणांमुळे आपल्याला फॉर्म 16 मिळालेला नसेल. परंतु, ज्या कर्मचार्‍यांचा टीडीएस कापला जातो, त्यांना फॉर्म 16 दिला जातो. याव्यतिरिक्त अनेकांना रिटर्न भरण्याची इच्छा असते. यासाठी फॉर्म 16 ची आवश्यकता भासते. रिटर्नसाठी आवश्यक असणार्‍या माहितीचा यात समावेश असतो. कंपनीने कधी आणि किती टीडीएस कापला, तसेच कोणत्या तारखेला जमा केला, यासारखी सविस्तर माहिती असते. कर्मचार्‍याला संपूर्ण आर्थिक वर्षात किती उत्पन्न मिळाले आणि विविध भत्त्याच्या आधारे कर कपातीचा कितपत लाभ मिळाला, त्याची संपूर्ण माहिती फॉर्म 16 मध्ये असते. बहुतांश कर्मचारी विविध कलमांतर्गत कर कपातीचा लाभ मिळण्यासाठी खर्च आणि गुंतवणुकीची माहिती लेखा विभागाला देत असतात. त्याचे विवरण फॉर्म 16 मध्ये असते. आपल्याकडे फॉर्म 16 नसेल, तरीही आयटीआर भरू शकता.

अन्य कागदपत्रे आवश्यक

नियमानुसार ज्या कर्मचार्‍यांचा टीडीएस कापला गेला आहे, त्यांना फॉर्म 16 मिळतोच. टीडीएस कापूनही एखाद्या कारणाने आपल्याला फॉर्म 16 मिळाला नसेल, तर या स्थितीत विविध मासिक भत्त्याच्या आधारे मिळणार्‍या करकपातीच्या लाभाचे आकलन करण्यास अडचणी येतात, तरीही आपण आयटीआर भरू शकता. आपण कर्मचारी असाल तर पे-स्लिप मिळते. ही स्लिप आपल्या वार्षिक उत्पन्नाचे आकलन करण्याचे प्रमुख स्रोत आहे. जी व्यक्ती भाड्याच्या घरात राहते, त्यांना भाड्याची पावती जोडणे गरजेचे आहे. कर्ज घेऊन घर खरेदी केले असेल, तर बँकेकडून स्टेटमेंट जोडणे महत्त्वाचे आहे. विमा पॉलिसी, आरेाग्य विम्यापोटी केलेला भरणा आदी कपातीच्या द़ृष्टीने केलेल्या गुंतवणुकीचे विवरण सादर करणे, तसेच मुलांची ट्यूशन फीचे प्रमाणपत्रही जोडावे लागणार आहे. आपण ही कागदपत्रे गोळा केली, तर रिटर्न भरण्याचे काम अधिक सुलभ होऊ शकते. हे काम आपण स्वत:ही करू शकता.

उत्पन्न आणि खर्चाचे विवरण

सर्वात अगोदर आपण वार्षिक उत्पन्नाचे आकलन करावे. एखाद्या मालमत्तेपासून आपल्या भाडे मिळत असेल, तर त्याचा यात समावेश करावा. बँक आणि पोस्टातील मुदत ठेवी आणि आरडीतून मिळणार्‍या व्याजाला आपल्या उत्पन्नाशी जोडून घ्यावे. पत्नी गृहिणी असेल, तर तिच्या नावाने असलेल्या मुदत ठेवी आणि आरडीवर मिळणार्‍या व्याजाला आपल्या उत्पन्नाशी जोडून घ्यावे. कर सवलत देणारे काही भत्ते कर्मचार्‍यांना मिळतात. यात एचआरए, एलटीए आणि शिक्षण भत्ता याचा प्रामुख्याने समावेश होतो. प्राप्तिकर कलम 80 सी नुसार एकूण दीड लाखापर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. विविध पातळ्यांवर मिळणार्‍या कर कपातीच्या लाभापोटी करण्यात येणारे खर्च आणि गुंतवणूक याची वार्षिक उत्पन्नातून वजावट करा. यातून मूळ उत्पन्न निघेल. आपले उत्पन्न करपात्र आहे की नाही, याची गणना प्राप्तिकर खात्याच्या कॅलक्युलेटरनेदेखील करता येऊ शकते.

फॉर्म 26 एएस

रिटर्न भरण्यासाठी आपण प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म 26 एएसचे आकलन करावे. यात संपूर्ण आर्थिक वर्षात टीडीएसचे विवरण दिलेले असते. याशिवाय रिफंडची माहितीदेखील दिलेली असते. मुदत ठेवीच्या गुंतवणुकीवर दहा हजारांपेक्षा कमी असलेल्या व्याजावर टीडीएस आकारले जात नाही. अनेकदा बहुतांश मंडळी कर वाचवण्यासाठी वेगवेगळ्या बँकांत मुदत ठेवी करतात. परंतु, आपण हे उत्पन्न लपवू शकत नाही. या उत्पन्नापासून जो काही कर लागू होतो, ते फॉर्म 26 एएसवर दिसेल. आपल्याला वेतनाशिवाय अन्य स्रोत असतील आणि त्यावर टीडीएस कापला गेलेला असेल, तर त्याचे विवरण 26 एएसमध्ये दिसेल. रिटर्न भरताना आपण अन्य स्रोतांचा उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये समावेश करावा. उत्पन्न लपवल्यास प्राप्तिकर विभागाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्या नावाने नोटीस येईल. आपल्याला आकारण्यात येणार्‍या टॅक्सपेक्षा दुप्पट रक्कम भरावी लागेल.

कर आकारणी

रिटर्न भरताना नोकरदार वर्गाला आयटीआर-1 फॉर्मची निवड करावी लागते. जेव्हा आपण उत्पन्नाचे विवरण भरतो, तेव्हा स्वत:लाच उत्पन्नाचे आकलन करावे लागते. चॅप्टर 6 एमध्ये सर्व सवलतीचे विवरण भल्यानंतर कराची रक्कम येईल. फॉर्म 26 एएसमध्ये अधिक कर आकारणी होत असेल आणि आणि कर कमी भरलेला असेल, तर उर्वरित रक्कम भरावी लागेल.

त्याचा भरणा आपण ‘पे ऑनलाईन’वर करू शकतो. यानंतर आपल्यावरील कर शून्य राहील. त्याचबरोबर रिटर्न भरण्याची प्रक्रियादेखील पूर्ण होईल. एखाद्या कारणाने अकारण टीडीएस कापला गेला असेल किंवा अधिक कर भरला गेला असेल आणि आपल्यावर कोणताही कर बसत नसेल, तर ती रक्कम रिफंड केली जाईल.

Back to top button