जागतिक उच्च रक्‍तदाब दिन विशेष : आई होताना…जडतोय उच्च रक्‍तदाब | पुढारी

जागतिक उच्च रक्‍तदाब दिन विशेष : आई होताना...जडतोय उच्च रक्‍तदाब

सातारा : विशाल गुजर
धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली, आहारातील बदल यामुळे महिलांमध्ये गर्भावस्थेत गुंतागुंत निर्माण होण्याची भीती असते. बहुतांश महिलांना गर्भावस्थेतील हायपर टेन्शन ही आजकाल सतावणारी समस्या पुढे आली आहे. सुमारे 5 टक्के गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळत असल्याने आई होताना हा आजार टाळण्याची गरज आहे. त्यातूनच प्री-एक्ल्मप्शियाची (गरोदरपणातील अतिरक्‍तदाब) शक्यता वाढीस लागत असल्याने वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

वेळेत निदान न झाल्यास बाळासाठी गंभीर…

प्री-एक्ल्मप्शियाचे वेळेत निदान न झाल्यास त्यातून माता आणि बाळासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यातून मातेमध्ये प्री-एक्ल्मप्शिया (गंभीर स्थिती) आणि ‘हेल्प’ (एचईएलएलपी-हेमोलायसिस, यकृतातील एन्झाइम्स वाढणे, प्लेटलेट्स कमी होणे) ही स्थिती निर्माण होण्याचा धोका असतो. त्यातून मूत्रपिंडाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होऊ शकते.

पुरेशा रक्‍तवाहिन्या तयार न झाल्याने समस्या

प्री-एक्ल्मप्शियामागे कोणतेही एक ठोस कारण नाही. मात्र, गर्भाच्या वारेत किंवा गर्भवेष्टनात पुरेशा रक्तवाहिन्या तयार न होणे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे पाहण्यात आले आहेत. शिवाय, बरेचदा नंतरच्या गरोदरपणाच्या तुलनेत पहिल्या गरोदरपणातच प्री-एक्ल्मप्शियाचा त्रास होतो.

प्री-एक्ल्मप्शियाचा आधीच येतो अंदाज

प्री-एक्ल्मप्शिया रोखण्यासाठी गेल्या काही दशकांमध्ये संशोधन करण्यात आले आहे. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यात कमी मात्रेत अ‍ॅस्पिरिनचा डोस दिल्यास (बेबी अ‍ॅस्पिरिन) प्री-एक्ल्मप्शिया होण्याची शक्यता कमी होते, असे निदर्शनास आले आहे. डॉपलर सोनोग्राफीसारख्या स्क्रीनिंग पद्धती आणि गरोदरपणाच्या तिस-या महिन्यात काही एन्झाइम्ससाठी रक्तचाचणी केल्यासही संबंधित महिलेला प्री-एक्ल्मप्शिया होण्याची शक्यता आहे का, याचा अंदाज बांधता येतो.

सुमारे 5 टक्के गर्भवती महिलांना हायपर टेन्शन

मातृत्वाचा काळ सुखाचा, हीच भावना गर्भावस्थेत प्रत्येक महिलेच्या मनात निर्माण झालेली असते. मात्र, या सुखद भावनेबरोबरच अनेक शंका-कुशंकांनी मनात केलेले घर अनेक समस्यांचे कारण बनू लागले आहे. बर्‍याचदा गर्भवती महिलांमध्ये हायपर टेन्शन (रक्तदाब वाढणे), हातांना आणि पायांना सूज आणि मुत्रात प्रोटीन जमा होणे, बाळाची वाढ खुंटणे, बाळाचा गर्भात मृत्यू होणे अशा समस्या उद्भवू शकतात. यालाच वैद्यकीय भाषेत ‘प्री-एक्ल्मप्शिया’ असे म्हटले जाते. बदलत्या जीवनशैलीत सुमारे 5 टक्के गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्‍तदाब समस्या दिसून येत आहे.

रक्‍तदाब वाढणे हे प्री-एक्ल्मप्शियाचे लक्षण

रक्तदाब वाढणे हे प्री-एक्ल्मप्शियाचे पहिले लक्षण असू शकते. त्यामुळे, हायपर टेन्शनचे वेळात वेळेत निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे सुरू करणे, वैद्यकीय चाचण्या, बाळाच्या हालचालींचे मोजमाप, सोनोग्राफी आणि डॉपलरच्या माध्यमातून माता आणि गर्भाशयातील बाळावर देखरेख ठेवणेही महत्त्वाचे आहे. देखभालीच्या यापैकी कोणत्याही पद्धतीतून मातेला किंवा बाळाला धोका असल्याचे निदान होत असल्यास डिलिव्हरी करावी लागते. त्यामुळेच गर्भावस्थेत एक्ल्मप्शिया असलेल्या मातांची पूर्ण दिवस भरण्याआधीच ठरवून डिलिव्हरी केली जाते.

वैद्यकीय उपचारांमधील आधुनिकता हा एक मोठा लाभ आहे आणि या प्रकारच्या आजारांचे नियंत्रण आणि ते उद्भवू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे माता आणि तिच्या गभार्तील बाळाच्या जीवाला धोका ठरणार्‍या अशा आजारांपासून त्यांना वाचवता येईल.
– डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक

प्री-एक्ल्मप्शियाचे वेळेत निदान न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण.
गर्भावस्थेत प्री-एक्ल्मप्शिया असलेल्या मातांची पूर्ण दिवस
भरण्याआधीच ठरवून डिलिव्हरी.
अ‍ॅस्पिरिनचा डोस दिल्यास (बेबी अ‍ॅस्पिरिन) प्री-एक्ल्मप्शिया होण्याची शक्यता कमी.

Back to top button