शालेय पोषण आहारात मधाचा समावेश करणार : सुभाष देसाई | पुढारी

शालेय पोषण आहारात मधाचा समावेश करणार : सुभाष देसाई

महाबळेश्‍वर : पुढारी वृत्तसेवा
मध आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी व उपयुक्‍त समजले जाते. त्यामुळे यापुढे शालेय पोषण आहारात मधाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्य शासन त्यासाठी आग्रही राहिल. या निर्णयामुळे मुलांची तब्बेत सुधारून आरोग्य चांगले राहील व मधपाळांचे आर्थिक जीवनमानही उंचावेल, अशी माहिती उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांनी दिली. दरम्यान, ‘मधाचे गाव’ प्रकल्पाचा मांघर येथे उत्साही वातावरणात शुभारंभ करण्यात आला.

देशातील पहिले मधाचे गाव म्हणून महाबळेश्‍वर तालुक्यातील मांघर या गावाची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ सोमवारी उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते व उद्योग व जनसंपर्क राज्यमंत्री ना. अदिती तटकरे, आ. मकरंद पाटील यांच्यासह राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंशू सिन्हा, उद्योग विभागाचे अप्पर सचिव बलदेव सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, प्र.मुख्य कार्यक्रारी अधिकारी सुषमा देसाई, महाबळेश्वर मध संचालनाचे संचालक दिग्विजय पाटील, मांघर गावाच्या सरपंच यशोदा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

ना. सुभाष देसाई म्हणाले, मांघर येथील मधाचे गाव प्रकल्प देशातील पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील असे प्रकल्प राबवण्यात येतील. ग्रामीण अर्थव्यवस्थेत मधमाशी पालनाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मधमाशी प्रकल्प राबवून त्याअंतर्गत मांघर या पहिल्या मधाच्या गावाचा अधिकृतपणे प्रारंभ होत आहे. या गावातील 80 टक्के लोकांची उपजिवीका ही या मधाच्या उद्योगावर अवलंबून आहे. यामुळे गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. मध हे आरोग्यासाठी लाभदायक असून पुढील पिढी सुदृढ रहावी यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून शालेय पोषण आहारामध्ये लहान मुलांना एक चमचा मध देण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

पर्यटन राज्यमंत्री ना. आदिती तटकरे म्हणाल्या, पर्यटन विभागाने कृषी पर्यटन धोरणाअंतर्गत मांघर गावाची प्रसिध्दी करावी. येथे येणार्‍या पर्यटकांना इथल्या मधुमक्षी पालन कशा पध्दतीने केले जाते, मधावर कशा पध्दतीची प्रक्रिया केली जाते याची माहिती त्यांना घेता येईल. त्याच बरोबर स्थानिकांना अधिकाधिक रोजगार मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावा.यापुढील दिडशे वर्षांचा विचार करून आपल्याला महाबळेश्‍वर शहर व तालुक्याचा विकास करायचा आहे. नॉर्थकोट पॉईंटच्या विकासासाठी लागणारा निधी पर्यटन विभागाकडून दिला जाईल.

आ मकरंद पाटील म्हणाले, आज खरोखर महाबळेश्वर तालुक्याला अभिमान वाटावा, अशी ही बाब आहे . मांघर या गावास मधाचे गाव म्हणुन जाहीर केल्याने महाबळेश्वरच्या लौकिकात भर पडली आहे. महाबळेश्वरसारखी निसर्ग संपदा देशात अन्यत्र फार कमी ठिकाणी पहावयास मिळेल. निसर्गाचा हा खजिना येथील लोकांनी जीवापाड जपला आहे. त्याचे संरक्षण व संवर्धन या लोकांनी केले आहे. सध्या मधाचे उत्पादन घटले आहे म्हणुन मधमाशांवर येणार्‍या रोगावर संशोधन करण्याची गरज आहे.

प्रास्ताविक राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या श्रीमती अंशू सिन्हा यांनी केले. सूत्रसंचालन उप मुख्य कार्यक्रारी अधिकारी बिपीन जगताप यांनी केले. आभार मध संचालनाचे संचालक दिग्विजय पाटील यांनी मानले.यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, तहसिलदार रणजितसिंह भोसले, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, पोनि संदिप भागवत, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, मधाचे गाव अध्यक्ष महादेवनाना जाधव, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, विमलताई पार्टे, घनःश्याम सपकाळ, बाबुदादा सपकाळ, तसेच मांघर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button