पुणे : टाकळीहाजी येथे अपघातात आईसह मुलीचा मृत्‍यू, एक गंभीर | पुढारी

पुणे : टाकळीहाजी येथे अपघातात आईसह मुलीचा मृत्‍यू, एक गंभीर

टाकळी हाजी (पुणे) : पुढारी वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील टाकळीहाजी ते फाकटे रोडवर हाअपघात झाला. या अपघातात आई आणि मुलगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. १५) सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास झाला. जिजाबाई केरूभाऊ पळसकर (वय ५२) आणि ताराबाई महादू साबळे (वय ७३) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलगी आणि आईचे नाव आहे, तर विलास महादु साबळे (वय ४७) हे गंभीर जखमी झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, टाकळीहाजी येथील विलास महादू साबळे व त्यांची आई ताराबाई महादू साबळे हे टाकळी हाजी येथून मोटर सायकलवर साबळेवाडीकडे जात होते. दरम्यान फाकटे रोडवर विलास यांची बहीण जिजाबाई केरभाऊ पळसकर रस्त्याने पायी चाललेली होती. तिला पाहिल्यानंतर विलास यांनी रस्त्याच्या कडेला गाडी थांबविली. विलास यांची आई ताराबाई व बहीण जिजाबाई या रस्त्याच्या कडेला दोघी बोलत असताना पाठीमागून ट्रक आला व भरधाव ट्रकने दोघींना व विलास बसलेला असलेल्या मोटरसायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला.

जिजाबाई यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ताराबाई या गंभीर झाल्या होत्या. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. स्थानिकांनी ताराबाई व विलास यांना तातडीची मदत करत दवाखान्यात हलविले. ताराबाई यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांचाही  उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक (एमएच १७ ओजी ९२५९) ताब्यात घेतला असून, अपघाती वाहने टाकळी हाजी पोलीस चौकीला आणुन लावली आहेत. या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले करत आहेत.

Back to top button