मुंबई : भाजपचे हिंदुत्व विकृत! | पुढारी

मुंबई : भाजपचे हिंदुत्व विकृत!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित शिवसेनेच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजप आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्‍ला चढवला. खोटा हिंदुत्वाचा मुखवटा घालणारा पक्ष देशाची दिशा भरकटवतोय असा टोला हाणत भाजपचे हिंदुत्व विकृत आहे, असे विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि प्रामुख्याने शिवसेनेला वेगवेगळ्या आयुधांनी जेरीस आणणारे भाजप नेते, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि हनुमान चालिसावरून भंडावून सोडणारे राणा दाम्पत्य यांचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला.
ते पुढे म्हणाले, टोपीत हिंदुत्व नसते तर टोपीखालच्या डोक्यात हिंदुत्व असते, भगवी टोपी घालून हिंदुत्व दिसत नसते. भाजपचे लोक मनोरुग्ण आहेत. ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला त्यांनी केसाने गळा कापला, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

हनुमान चालिसावाले भाजपची ए, बी, सी टीम

हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून आणि मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणावरून त्यांनी राज ठाकरे आणि राणा दाम्पत्यावर टीका केली. काश्मिरी पंडितांना संरक्षण नाही आणि टिनपाटांना झेड सिक्युरिटी देण्यात येत आहे, या सुरक्षेचा पैसा काय त्यांच्या बापाचा माल आहे काय, असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला.

हिंदुत्व धोतर आहे का ?

सत्ता असो वा नसो मला पर्वा नाही. माझे हिंदुत्व तकलादू नाही हे मी विधानसभेत सांगितले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत गेल्याने आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका झाली. हिंदुत्व सोडायला ते धोतर आहे का? आम्ही दोन्ही काँग्रेससोबत खूलेआमपणे गेलो. तुम्हीही राष्ट्रवादीसोबत सकाळच्यावेळी गेले नव्हता काय?, असेही ते यावेळी आपला हल्ला आणखी धारदार करताना म्हणाले.
फडणवीसांच्या साठ पिढ्यांना मुंबई वेगळी करता येणार नाही.

मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आमच्या 106 हुतात्मांनी बलिदान देऊन मुंबई एकसंघ ठेवली आहे. यासाठी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांनी काम केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून हा प्रयत्न सुरू आहे. असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला आहे. बीकेसीतून मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होत आहे. आपण बुलेट ट्रेन मागितली होती का? हा सर्व मुंबई तोडण्याचा प्रयत्न आहे.मात्र फडणवीसांच्या साठ पिढ्यांना मुंबई वेगळी करता येणार नाही, हे लक्षात ठेवावे, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. सभेला सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उद्धव ठाकरे काय बोलले…

दाऊद भाजपमध्ये आला तर हे त्यालाही मंत्री बनवतील
काश्मिरी पंडितांना संरक्षण नाही आणि टिनपाटांना झेड सुरक्षा?
हनुमान चालिसा, भोंगेवाले भाजपचीच ए, बी अन् सी टीम
आम्ही गुपचूप सकाळी शपथ घेतली नाही
देवेंद्र फडणवीस, तुम्ही असता तर नुसत्या वजनाने बाबरी पडली असती
काहीजण बाळासाहेबांसारखे शाल पांघरून फिरतात, यांचा केमिकल लोचा झालाय

Back to top button