नगर : शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू | पुढारी

नगर : शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

संगमनेर (नगर) : पुढारी वृत्तसेवा
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील मोधळवाडी गावांत असलेल्या घाणेवस्ती येथे शेततळ्यामध्ये बुडून सख्ख्या बहीण- भावाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.०८) सकाळी घडली. या दुर्घटनेमुळे मोधळवाडी गावासह पठारभाग परिसरात शोककळा पसरली आहे. जयश्री बबन शिंदे वय (वर्षे २१) व आयुष बबन शिंदे वय (७) असे शेततळ्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडलेल्या बहीण-भावाचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहातात. रविवारी सकाळी त्यांची मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे धुणे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने   शेततळ्यात उडी मारली मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

बहीण भाऊ शेततळ्यामध्ये बुडाल्याची माहिती समजताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.नागरिकांनी दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढले. मात्र त्यापूर्वीच दाेघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

बहीण- भावाच्या मृत्यूने गावकरी हळहळले

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव येथील दोघा सख्‍ख्‍या बहिण-भावाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. घटनास्थळाचे  दृश्य पाहताच गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. या दुर्घटनेमुळे पिंपळगाव देपा गावासह पठार भागावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button