दिलीप वळसे-पाटील : 'कुणीतरी येणार आणि भोंगे काढायला सांगणार, ही काय हुकुमशाही आहे का ?' | पुढारी

दिलीप वळसे-पाटील : 'कुणीतरी येणार आणि भोंगे काढायला सांगणार, ही काय हुकुमशाही आहे का ?'

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “राज्यात अशांतता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही जणांकडून केले जात आहेत. पोलिसांकडून योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली जात आहे. महागाईसारख्या प्रश्नांवर सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. औद्योगिक आणि कृषी क्षेत्र अडचणीत आहे. त्या मूलभूत प्रश्नांवर आंदोलन न होता इतर बाबींवर आंदोलन होताना दिसत आहेत. भाजपचे काही नेते महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करत आहेत”, असा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला.

दिलीप वळसे-पाटील एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. ते म्हणाले, “राज्याची नकारात्मक प्रतिमा करण्याचे प्रयत्न काही जणांकडून होत आहेत. राज ठाकरेंबाबत औरंगाबाद पोलिसांनी घेतेले निर्णय योग्यच आहेत. राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा अमरावतीमध्ये वाचायला हवी होती. मुंबईत शोबाजी कशाला?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि त्यासंदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं. त्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना वळसे पाटील म्हणाले, “राजद्रोहाच्या कलमाबाबत केंद्रानेच गाईडलाईन ठरवणे गरजेचे आहे. त्यामुळे राजद्रोहाचं कलमच राहिलं नाही, तर त्याच्या गैरवापरही होणार नाही.”

राज ठाकरे आणि भोंगा मुद्द्यावर प्रश्न विचारल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, “मत व्यक्त करणे, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. पण, प्रत्येकाने कायद्याचा आदर राखावा. कुणीतरी येणार आणि भोंगे काढायला सांगणार, ही काय हुकुमशाही आहे का? भोंग्यांसंदर्भात केंद्राने धोरण ठरवणे गरजेचे आहे”, असे सांगत दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

पहा व्हिडीओ : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा थोडक्यात

Back to top button