पाटण : कोयना जादा वीजनिर्मितीमुळे लवादाला शॉक | पुढारी

पाटण : कोयना जादा वीजनिर्मितीमुळे लवादाला शॉक

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

चालू वर्षी राज्यात विजेचा तुटवडा आहे. कोयना धरण निर्मितीनंतर पाणी वाटप लवादाने दिलेल्या आरक्षण पाणी कोट्यापेक्षाही यंदा अतिरिक्त दहा टीएमसी जादा पाणी वापरायला शासनाने परवानगी दिली आहे. यावर्षी लवाद तथा आरक्षण कोट्याला ‘शॉक’ देऊनही कोयनेतून गरजेइतकी वीजनिर्मिती अशक्य आहे. मे महिन्यातील सर्वाधिक उन्हाळ्यातील आगामी 25 दिवसांचे भवितव्य अवघ्या 5.51 टीएमसी पाण्यावर अवलंबून आहे. या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आगामी नव्या वर्षारंभालाही अपेक्षीत पाणीसाठा शिल्लक ठेवण्यासाठी जलसंपदा व ऊर्जा विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे .

ऑक्टोबर 2021 महिन्यात कोळसा तुटवड्यामुळे कोयना जलविद्युत प्रकल्पांवर वीजनिर्मितीचा अतिरिक्त भार पडल्याने येथून सरासरीच्या कितीतरी पटीने ज्यादा वीजनिर्मिती करण्यात आली. या अतिरिक्त वीजनिर्मितीमुळे ऐन उन्हाळ्यात कोयना वीजनिर्मितीला पाण्याचे चटके बसत आहेत. यावर्षी आत्तापर्यंत 3395.926 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली असून गतवर्षीच्या तुलनेत 691.157 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे .

5 मे पर्यंत कोयना धरणाच्या चार जलविद्युत प्रकल्पातून 3395.926 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आत्तापर्यंत तब्बल 691.157 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे. एक जून पासूनच्या जल वर्षापैकी आत्तापर्यंत पश्चिमेकडे 71.99 टीएमसी पाण्यावर 3279.678 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी आत्तापर्यंत 56.12 टीएमसी पाण्यावर 2557.853 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी पश्चिमेकडे 14.87 टीएमसी पाणी वापर ज्यादा झाला व परिणामी 721.825 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती ज्यादा झाली आहे .

पूर्वेकडे सिंचनासाठी किंवा पूरकाळात सोडण्यात येणा-या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. यावर्षी आत्तापर्यंत सिंचनासाठी 17.50 व पूरकाळात 7.86 अशा 25.36 टीएमसी पाण्यावर 115.248 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचन व पूरकाळात 32.79 टीएमसी पाण्यावर 146.916 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 7.43 टीएमसी पाणीवापर कमी झाला आणि यामुळे 31.668 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे .
चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता येथे यावर्षी एकूण 97.35 टीएमसी पाण्यावर 3395.926 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.त्याचवेळी गतवर्षी 88.91 टीएमसी पाण्यावर 2704.769 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चार प्रकल्पांसाठी केवळ 8.44 टीएमसी पाणीवापर ज्यादा झाला असून पश्चिमेकडे तुलनात्मक जादा पाणी वापर झाल्याने तब्बल 691.157 दशलक्ष युनिट ज्यादा वीजनिर्मिती झाली आहे .

Back to top button