मनसेची माघार!!! उद्याचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द | पुढारी

मनसेची माघार!!! उद्याचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : “३ तारखेला ईद आहे. मला त्यांच्या सणात यायचं नाही. पण, ४ तारखेपासून ऐकणार नाही”, असा अल्टिमेटम मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला दिला. असं असलं तर ३ तारखेला मनसेकडून महाराष्ट्रात महाआरतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मुस्लीम धर्माच्या सणामध्ये व्यत्यय नको म्हणून राज ठाकरेंनी हा निर्णय घेत आहे, अशी माहिती मनसेचे प्रवक्ते योगो खैरे यांनी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्या (३ मे) पुण्यात होणारा महाआरतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. मनसे, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी एकत्र येऊन उद्या पुण्यातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये भोंगे लावून आरती करण्यात येईल, असे शनिवारी (३० एप्रिल) जाहीर केले होते. त्यासाठी मनसेच्या सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता मनसेकडून महाआरतीचा कार्यक्रम स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

औरंगाबादच्या सभेत काय म्हणाले होते राज ठाकरे? 

“मला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. मी फक्त मशिदीवरील भोंग्यांना पर्याय दिला आहे. तुम्ही भोंगे काढले नाही तर हनुमान चालिसा लावू, जर भोंग्यांना धार्मिक रंग दिला, तर आम्हीदेखील तसेच उत्तर देऊ. आमची इच्छा नसताना टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. सगळेच भोंगे बेकायदेशीर आहेत, हे लक्षात ठेवा. युपीमध्ये भोंगे उतवले जातात, तर महाराष्ट्रात का नाही? ४ तारखेनंतर आम्ही अजिबात ऐकणार नाही. जिथेजिथे मशिदीवर भोंगे लागतील, तिथे हनुमान चालिसा लावणार.”, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

“अजान तातडीने बंद करणार नसतील, तर या लोकांची थोबाडं बंद करा. महाराष्ट्रातील जनतेला मी सांगतो की, जर भोंगे उतरले गेले नाही, तर अजिबात शांत बसू नका. ३ तारखेपर्यंत भोंगे झाले नाहीत, तर थेट ४ तारखेपासून हनुमान चालिसा लावा. हवंतर परवानगी घ्या. पण दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावा. प्रेमानं एकदा समजावून सांगा, अनथ्या एकदा होऊन जाऊन द्या”, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

पहा व्हिडिओ : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा थोडक्यात

Back to top button