राही सरनोबत : २०२४ ऑलिम्पिकवर लक्ष्य..!

कोल्हापूर; सागर यादव : राही सरनोबत हिने आता पुढील लक्ष २०२४ च्या ऑलिम्पिकवर असल्याचे सांगितले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून परतलेल्या राहीने बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहीचे वडील जीवन सरनोबत, भाऊ आदित्य सरनोबत, काका राजेंद्र सरनोबत आदी उपस्थित होते.

प्रेक्षकांशिवाय स्पर्धा नकोशी

कोरोनामुळे टोकियोतील नागरिकांचा ऑलिम्पिकला विरोधच होता. याशिवाय सुरक्षिततेच्या कारणांमुळे स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडाप्रेमींना येण्यास बंदी होती. खेळाडूंनाही स्पर्धेचे ठिकाण सोडून इतरत्र जाता येत नव्हते. पदक विजेत्या खेळाडूंना मास्कची सक्ती व त्यांच्या कामगिरीचे टाळ्या-शिट्ट्या वाजवत जयघोष करणारे क्रीडाप्रेमीही नसल्याने स्पर्धा नकोशी वाटत असल्याचे राहीने सांगितले.

एक वर्षाचा उशीर परिणामकारक

2020 मध्ये होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकला कोरोनामुळे एक वर्षे उशीर झाला. याचा परिणाम खेळाडूंवर झाला. एक वर्ष ऑलिम्पिक पुढे गेल्याने नियोजित वेळापत्रक व तयारी यांचे गणित बिघडल्याने नव्याने तयारी करावी लागली.

नियोजित वेळेत स्पर्धा झाली असती, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता, तरीही या अनुभवाचा सकारात्मक फायदा नक्कीच खेळाडूंना होईल, असा आत्मविश्वास राहीने व्यक्त केला.

मानसिक, शारीरिक, तांत्रिक कारणांचाही परिणाम

सहा-सात वर्षांपूर्वीच्या मानसिक, शारीरिक व तांत्रिक कारणांवर मात केली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती पुन्हा उद्भवली. यामुळे कामगिरीवर परिणाम झाला. भविष्यात या गोष्टींवर विशेष काम करून कामगिरीत सुधारणांवर भर देणार असल्याचे राहीने सांगितले. प्रशिक्षकांनी खेळाडूंकडून उत्तम कामगिरीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला. जर्मनीच्या प्रशिक्षक मुखबयार यांच्या प्रशिक्षणाची कमतरता आवर्जून जाणवल्याचे राहीने सांगितले.

सहा महिने कोणत्याही स्पर्धेत सहभाग नाही

आता एक महिन्याची सुट्टी घेणार आहे. मित्रमंडळी, पाहुणे यांच्या भेटीगाठीसह गावाकडील शेतात आणि निसर्गात मनसोक्त फिरणार आहे. आवडीचे पदार्थ मनसोक्त खाणार आहे. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून सरावाला सुरुवात करणार आहे.

पुढील सहा महिने कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही. या कालावधीत नेमबाजीतील बेसीकवर भरपूर काम करणार आहे. झालेल्या चुका, राहिलेल्या त्रुटी याबाबत सुधारणा करून पाया भक्कम करणार असल्याचे राहीने सांगितले.

नोकरीपेक्षा खेळाला प्राथमिकता

राज्य शासनाने नोकरी दिली आहे. 2024 च्या ऑलिम्पिकपर्यंत नोकरीपेक्षा खेळालाच प्राथमिकता असणार आहे. शासनाकडून आवश्यक पाठबळ सातत्याने दिले जात आहे; पण काही वेळा काही बाबतीत उशीर होतो. खेळाकडे दुर्लक्ष करून नोकरीकडे लक्ष देणे योग्य वाटत नसल्याचे राहीने स्पष्ट केले.

वाचनाची आवड जपतेय

वाचनाची आवड लहाणपणापासूनच आहे. यामुळे ती जपण्यावर भर असतो. टोकियो ऑलिम्पिकच्या स्पर्धेसाठी जातानाही बॅगमधून पुस्तके नेली होतीच. लेखानाचीही आवड आहे; मात्र ते स्वत:साठी करते. आलेले अनुभव, स्मरणात राहणार्‍या गोष्टी यांच्या टिप्पण्या ठेवल्याने त्यांचा उपयोग भविष्यातील सुधारणांसाठी होत असल्याचे राहीने सांगितले.

Back to top button