कोरोनाच्या भीतीने वडिलांचा मृतदेह ३ दिवस घरात; मुलीची आत्महत्या | पुढारी

कोरोनाच्या भीतीने वडिलांचा मृतदेह ३ दिवस घरात; मुलीची आत्महत्या

नालासोपारा; पुढारी वृत्तसेवा : विरार पश्चिमेला अग्रवाल कॉम्प्लेक्स ब्रूकलीन पार्कमध्ये धक्कादायक घटनासमोर आली आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे आपल्यालाही क्वारंटाईन करतील, या भीतीने विरारमधील दोन बहिणींनी वडिलांचा मृतदेह तब्बल चार दिवस घरात दडवून ठेवला.

मात्र नैराश्य आल्याने मंगळवारी एका बहिणीने आत्महत्या केली. ते पाहून दुसर्‍या बहिणीनेदेखील बुधवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचविण्यात पोलिसांना यश आले.

विरार पश्चिमेच्या अग्रवाल येथील गोकूळ टाऊनशिपमध्ये ब्रूकलीन अपार्टमेंटमध्ये हरिदास सहरकर (72) हे पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. त्यांना मिळणार्‍या निवृत्ती वेतनावर घर चालत होते. त्यांना विद्या (40) आणि स्वप्नाली (36) या दोन अविवाहित मुली होत्या. 1 ऑगस्ट रोजी हरिदास यांचे निधन झाले.

मात्र वडिलांचे निधन हे कोरोनामुळे झाले असे मुलींना वाटले. हे जर समजले तर सर्वांना क्वारंटाईन करतील, अशी भीती मुलींना वाटली. यामुळे त्यांनी वडिलांचा मृतदेह घरातच बेडवर दडवून ठेवला होता.

मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून मृतदेहाच्या शेजारी डांबर गोळी, कापूर, अगरबत्ती लावून सर्व कुटुंब हे घरातच मृतदेहाशेजारी बसून होते. मंगळवारी विद्या हिने नवापूर समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. तिची ओळख पटली नव्हती.

बुधवारी सकाळी लहान बहिण स्वप्नाली हिनेदेखील याच समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक आणि स्थानिक पोलिसांनी तिला वाचवले. तिच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला.

हरिदास यांचा 1 ऑगस्टला मृत्यू झाला होता. कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास आपल्याला क्वारंटाईन करतील, अशी त्यांना भीती होती. यामुळे त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली नव्हती.

तो मृतदेहदेखील ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवत आहोत, असे पोलिसांनी सांगितले आहे. हरिदास हे रेशनिंग ऑफिसर म्हणून ते काम करत होते.

निवृत्त झाल्यानंतर घरात ते एकमेव कमावणारे होते. त्यामुळे यामागे कौटुंबिक, तसेच आर्थिक कारणदेखील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.

Back to top button