Satara : जिल्ह्यात महाराष्ट्र दिनापासून एसटी पूर्ववत धावणार | पुढारी

Satara : जिल्ह्यात महाराष्ट्र दिनापासून एसटी पूर्ववत धावणार

सातारा : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या 11 आगारामधील सर्वच कर्मचारी कामावर येण्यास सुरुवात झाली आहे. राहिलेले कर्मचारी दि. 30 एप्रिलपर्यंत हजर होतील. तसेच काही एसटी बसेसची तांत्रीक कामे सुरु असल्यामुळे दि. 1 मे महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यातील सर्व मार्गावर एसटी वाहतूक पुर्ववत सुरू होणार आहे.

एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी सुमारे साडेपाच महिने संप पुकारला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सर्वच कर्मचार्‍यांना दि. 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा या 11 आगारातील कर्मचारी कामावर हजर झाले असल्याने लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात धावणार्‍या एसटीची चाके सुसाट धावू लागली आहेत.

संपाच्या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्ग प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यामुळे खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्यात आले. मात्र गेल्या 8 दिवसापासून एसटीची वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. लांबपल्ल्याच्या मार्गावर धावणार्‍या सर्व बसेस प्रवाशांनी हाऊसफुल्ल भरून वहात आहेत. सध्या यात्रा जत्रा, लग्नसोहळे सुरू असल्याने सर्वच बसेसंना प्रवाशांची गर्दी होवू लागली आहे. लग्नसमारंभांनाही एसटी बसेस आरक्षीत होताना दिसत आहेत.

सध्या रातराणी बसेसही सुरू झाल्या आहेत. उन्हाळी हंगामासह जादा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सातारा विभागातील सातारा, वाई, महाबळेश्वर, कराड, पाचगणी, वडूज यासह अन्य बसस्थानके प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. तसेच बसस्थानकात बाहेरील आगाराच्या एसटी बसेसची येजा सुरू झाली आहे. त्यामुळे एसटीच्या दैंनदिन उत्पन्नात वाढ होवू लागली आहे. सातारा विभागातील सर्वच आगारातील एसटी कर्मचारी अधिकारी एसटीला पूर्वपदावर आणण्यासाठी परीश्रम घेत आहेत.

पर्यटन बसला पर्यटकांचा प्रतिसाद…

खास उन्हाळी हंगामानिमित्त पर्यटकांसाठी महाबळेश्वर आगाराच्यावतीने महाबळेश्वर व प्रतापगड दर्शन पर्यटन बसेस सुरु करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक नामदेवराव पतंगे यांनी दिली. महाबळेश्वर दर्शन ही पर्यटन बस सातार्‍यातून सकाळी 7.30 वाजता सुटते. महाबळेश्वर दर्शनासाठी तिकीट दर 100 रुपये असून प्रतापगड दर्शनासाठी तिकीट दर 110 रुपये आहे. पर्यटकांनी या बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button