सेवाग्राम! स्वातंत्र्यलढ्याची राजधानी 86 वर्षांची झाली | पुढारी

सेवाग्राम! स्वातंत्र्यलढ्याची राजधानी 86 वर्षांची झाली

वर्धा,  पुढारी वृत्तसेवा :  वर्धा जिल्ह्यासह सेवाग्रामची ओळख ही देशातच नव्हे तर विदेशातही भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची राजधानी अशीच आहे. याच राजधानीची पायाभरणी करण्यासाठी महात्मा गांधी 30 एप्रिल 1936 रोजी वर्ध्यातून सेवाग्राम मुक्कामी पायी गेले. 86 वर्षांपूर्वीचा हा क्षण सेवाग्रामला नवीन ओळख देणारा ठरला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या दिवसाच्या अमृतक्षणाची ओळख पुसट होऊ न देण्याचे आव्हान आहे.

जमनालालजी बजाज यांच्या आग्रहामुळे गांधीजी पहिल्यांदा 23 सप्टेंबर 1933 रोजी रेल्वेने वर्ध्यात उतरलेे. काही दिवस महिला आश्रमात थांबले. बजाजवाडी, मगनवाडीत त्यांचा काही दिवस मुक्काम होता. त्यावेळच्या सेगावमध्ये (आताचे सेवाग्राम) एका साध्या कुटीत ब्रिटिश अ‍ॅडमिरलची मुलगी मिस स्लेड उपाख्य मीराबेन राहात होत्या.

बापूंनी दिलेल्या ग्रामसेवेच्या व्रताचे पालन त्या एका साध्या कुटीत राहून करीत. बापूंनीही पुढील मुक्कामाकरिता सेगाव निवडले. 30 एप्रिल 1936 ला पहाटे बापू वर्ध्यापासून 8 किलोमीटर अंतरावरील सेगावकडे पायी जाण्यास निघाले. त्यावेळी बापूंचे वय 67 होते. बापूंसोबत जमनालालजी बजाज आणि बलवंतसिंह होते. सेगावला पोहोचताच त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. सेगावला मुक्कामी येण्याचा उद्देश सांगितला. त्यानंतर चार वर्षांनी 5 मार्च 1940 रोजी बापूंनी सेगावचे नामकरण ‘सेवाग्राम’ केले.

बापूंच्या निवासासाठी 500 रुपयांच्या आत खर्च करीत ‘आदिनिवास’ उभारले गेले. या निवासातील एका कोपर्‍यात बापू, एका कोपर्‍यात बा, एका कोपर्‍यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर एका कोपर्‍यात सरहद्द गांधी अब्दुल गफारखान राहायचे. पुढे भेटणार्‍यांची संख्या वाढल्याने बापूंनी मीराबेनच्या कुटीत मुक्काम हलविला. तिचे पुढे नामकरण बापूकुटी झाले.

याच बापूकुटीतून स्वातंत्र्यलढ्याचे नियोजन सुरू झाले. तेव्हा तारा मोठ्या कष्टाने पोहोचत. संवादाच्या मर्यादित साधनांतही सेवाग्रामातून निघालेला बापूंचा संदेश देशाच्या कानाकोपर्‍यात जायचा. 1940चा वैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव वर्ध्यातच मंजूर झाला.
15 आणि 16 जानेवारी 1942 ला भारतीय काँग्रेसची वर्ध्यात बैठक झाली. भारत छोडो हाक देण्याचा प्रस्ताव याच बैठकीसमोर आला. त्यानंतर 6 ते 14 जुलै 1942 पर्यंत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक वर्ध्यात झाली. त्यातली 8, 9, 10 जुलैची सभा सेवाग्राम आश्रमात झाली.

त्यावेळी बापूंसह काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम आझाद, पं. नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान, आचार्य कृपलानी, गोविंदवल्लभ पंत, सरोजिनी नायडू, पट्टाभी सीतारामय्या आदी उपस्थित होते. 14 जुलै 1942 ला बजाजवाडीत 700 शब्दांचा भारत छोडोचा ठराव मंजूर झाला. या निर्णायक लढ्याची पायाभरणी बापू सेवाग्रामला आले त्या दिवशी म्हणजे 30 एप्रिल 1936 रोजी झाली आणि भारत छोडो आंदोलन उभे राहिले. बापू सेवाग्राममधून 25 ऑगस्ट 1946 रोजी दिल्लीला गेले.
त्यांना पुन्हा 2 फेब्रुवारी 1948ला सेवाग्रामला यायचे होते. पण ते परत येऊच शकले नाहीत. तत्पूर्वीच त्यांची हत्या झाली आणि सेवाग्राम बापूंना कायमचे पारखे झाले.

गांधीजी वर्धा शहर आणि सेवाग्रामात एकूण 2688 दिवस राहिले. त्यातील 1916 दिवस त्यांचा मुक्काम सेवाग्रामला होता. विविध कामांनी बापू वर्ध्यात यायचे, पण पायी! त्यावेळी जमनालालजी त्यांना घोडागाडीने जा म्हणायचे. पण बापू पायीच वर्ध्याकडे जात. काँग्रेसच्या बैठकीला ते खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहत.

Back to top button