आधी गुजरातचं आणि आता युपीचं कौतुक करताहेत; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला | पुढारी

आधी गुजरातचं आणि आता युपीचं कौतुक करताहेत; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करायचं नाही असं ठरवलं असेल तर मग दुसर्‍या राज्याचे कौतुक ते करणारच”, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला आहे.

राज ठाकरे यांनी युपीचे कौतुक केले आहे, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तरे दिली. “एकदा गुजरातचं कौतुक करुन झालं आता युपीचं कौतुक करतील आणि महाराष्ट्र सोडून सर्व राज्याचं कौतुक करायला दौरे करतील. दुसर्‍या राज्यात जाऊन त्या राज्यांचे कौतुक राज ठाकरे करतच राहणार आहेत”, असेही जयंत पाटील म्हणाले.

“मुंबईतील हिंदी भाषिक मनसेच्या मागच्या वागण्यामुळे कितीतरी लांब जातील याची भाजपला माहिती आहे. त्यामुळे भाजपकडून संघाने केलं म्हणून आम्ही करतोय अशी स्टोरी तयार व्हायला लागलेली दिसते. शिवसेना होती म्हणून विरोध करण्याचा प्रश्न नव्हता. मुळात चर्चा झालीच नाही तर विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठून. आमची कॉंग्रेसबरोबर आघाडी होती. आमची आघाडी विरोधी पक्षाचे काम करत होती. त्यामुळे भाजपला आमच्याशी चर्चा करायची गरज का वाटली”, असा उलट सवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपकडून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेला उत्तर देताना केला.

“आमच्याशी भाजपने चर्चा का केली. त्यातून शिवसेनेला बाजूला करा असं म्हणत असू तर या सगळ्या हवेतील गप्पा आहेत. तुम्ही सत्तेत असताना तुमच्याबरोबर तुमचा मित्र पक्ष असताना तुम्ही राष्ट्रवादीबरोबर चर्चा का केली हा प्रश्न माझ्यावतीने भाजपला विचारा”, असेही जयंत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

“भारतात प्रचंड महागाई वाढलेली आहे त्याचे दुष्परिणाम शेजारच्या देशात म्हणजे श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील महागाईची जबाबदारी राज्याराज्यावर टाकून हात झटकण्याचा प्रयत्न आहे. खरे महागाईचे मुळ केंद्रात आहे हे विसरता येणार नाही. केंद्रसरकार कुठल्याही राज्याला आऊट ऑफ वे जाऊन फारशी मदत करु शकत नाही. योजना असतात त्या योजनांवर पैसे येत असतात. असे एकाच राज्याला जास्त पैसे देणे या ज्या घोषणा मोदीसाहेब वेगवेगळ्या राज्यात जाऊन करतात मात्र तसं ते देऊ शकत नाहीत. पण काय करणार देशाचे पंतप्रधान बोलत असल्याने लोकं ऐकून घेतात”, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

Back to top button