साताऱ्याच्या प्रवीण जाधव याला घर बांधताना शेजाऱ्यांचा त्रास | पुढारी

साताऱ्याच्या प्रवीण जाधव याला घर बांधताना शेजाऱ्यांचा त्रास

फलटण; पुढारी वृत्तसेवा : टोकियो ऑलिम्पिकमध्ये कसब दाखवणारा भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याच्या कुटुंबाला घर बांधण्यास अडथळा निर्माण केला जात होता. या प्रकरणात तोडगा निघाला असून लवकरच प्रवीण जाधव याचे घर उभारेल, असे फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितिन सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, प्रविण जाधव याच्या कुटुंबाला धमक्या दिल्याची व धमकाविणारे त्याचे शेजारीच असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जाधव कुटुंबियांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली.

सैन्यात भरती झाल्यावर घर बांधले

टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रशियाच्या गलसान बझारझापोव्हला हरवले. एलिमिनेशन राऊंडमध्ये प्रविण जाधव याने ही कामगिरी केली. पण मात्र अंतिम सोळा जणांच्या फेरीत प्रवीणचा अमेरिकेच्या तिरंदाजाने पराभव केला. यामुळे त्याचे वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

प्रविणने ऑलिम्पिकमध्ये लक्षवेधक कामगिरी करत देशातील युवा पिढीपुढे आदर्श निर्माण केला.

प्रविणचे कुटुंब पूर्वी झोपडीत रहायचे. त्याने सैन्यात भरती झाल्यानंतर घर बांधले. या ठिकाणच्या जागेवरुन त्याच्या कुटुंबियांना यापुर्वी देखील काही लोकांनी त्रास दिल्याचे प्रविण सांगतो.

आई वडिलांना धमकावले

काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत प्रविणने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, एका कुटुंबातील पाच ते सहा लोक आले आणि त्यांनी माझे आई-वडील, काका आणि काकूंना धमकावण्यास सुरुवात केली.

आम्हाला आमचे घर दुरुस्त करायचे आहे. परंतू ते करुन देत नाहीत. संबंधितांना आमच्या जागेपासून एक वेगळी लेन हवी होती. ज्याला आम्ही सहमती दिली.

पण आता ते संपूर्ण सीमा रेषा ओलांडत आहेत. ते आम्हाला घर दुरुस्त करण्यापासून कसे रोखू शकतात?

सातारा पोलिसांचे योगदान

आम्ही त्या घरात वर्षानुवर्षे राहत आहोत आणि आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. सध्या माझे कुटुंब अस्वस्थ आहे आणि मी ही तिथे नाही.

मी लष्कराच्या अधिकार्‍यांना याबाबत सांगितले आहे आणि ते त्याकडे १०० टक्के लक्ष देत आहेत.

सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी देखील माझ्या कुटुंबाला पूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे.

लष्करात असणार्‍या प्रविण जाधव याला शेती महामंडळाची १५ गुंठे जागा मिळालेली आहे.

त्याप्रमाणे प्रविणने ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी तेथे घर बांधण्यास सुरुवात केली होती.

मात्र शेजारी असणार्‍या कुटुंबाने रस्ता ठेवण्यासाठी त्याला हरकत घेतली आणि ते घर बांधायला अडथळा निर्माण करत होते.

मंगळवारी सकाळी सरडे येथे तत्परतेने जाऊन फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितिन सावंत यांनी शेजारच्या कुटुंबांशी चर्चा करुन हे प्रकरण मिटवले.

लवकरच प्रविण जाधवचे घर उभारेल, असा तोडगा काढला आहे.

हे ही पाहा : 

Back to top button