सातारा : ट्राफिक पोलिसांनी लावला ७ हजारांचा दंड; दुचाकीचालकाकडून रस्त्यातच आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

सातारा : ट्राफिक पोलिसांनी लावला ७ हजारांचा दंड; दुचाकीचालकाकडून रस्त्यातच आत्महत्येचा प्रयत्न

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा शहर वाहतूक पोलिसांनी ट्रिपल सीट, नंबर प्लेट आणि वाहन परवाना नसल्याने एका युवकाला दंडाची रक्कम सांगितल्यानंतर ती भरण्यास त्याने नकार दिला. तसेच पोलिसांशी सोबत हुज्जत घातली. यावेळी डिझेलसारखा द्रव पदार्थ आणून अंगावर ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने स्टॅन्ड परिसर हादरुन गेला. दरम्यान, स्टंट करणार्‍या युवकाने चूक कबूल केल्याचेही मान्य केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दुपारी २ वाजता घडली आहे. शासकीय कामात अडथळ्यांसह आत्महत्येचा प्रयत्न करणे प्रकरणी युवराज उत्तम लोखंडे (वय-३३, रा. शाहूपुरी मूळ रा. कामेरी ता. सातारा) याच्या विरुद्ध पोलीस हवालदार सोमनाथ शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

तक्रारदार पोलीस सोमनाथ शिंदे हे सोमवारी दुपारी स्टॅन्ड परिसरातील राधिका सिग्नलजवळ कर्तव्य बजावत होते. यावेळी एक एसटी बंद पडल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाले होती. पोलीस वाहतुक सुरळीत करत असताना युवराज लोखंडे हा ट्रिपल सीट आला. पोलिसांनी त्याला बाजूला दुचाकी घेऊन थांबवले. त्याला वाहन परवाना विचारले असता त्याने नसल्याचे सांगितले. त्याच्या दुचाकीच्या पुढे नंबर प्लेट नव्हती तर पाठीमागे नंबर प्लेट होती. तसेच दुचाकीला प्रेशर हॉर्न होते. पोलिसांनी यावरुन दंडाची रक्कम सुमारे ७ हजार रुपये सांगितली.

दंडाची रक्कम ऐकताच लोखंडे याने वाद घालत पैसे नसल्याचे सांगितले. दंड कमी, अधिक करणार्‍यावरुन शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर लोखंडे याने दुचाकी तेथेच सोडली आणि तो निघून गेला. काही वेळानंतर मात्र तो परत आला व त्याने येताना सोबत डिझेल सदृश पदार्थ आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर थबकला. संशयित लोखंडे याने ‘तुम्हाला दाखवतो. तुमची नोकरी घालवतो,’ असे जोरजोरात ओरडून गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी पीसीआर व्हॅन बोलावून लोखंडे याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

पोलीस आकारत आहेत अव्वाच्या सव्वा दंड

वाहतुक विभागाचे दंड गेल्या सहा महिन्यांपासून अव्वाच्या सव्वा झाले आहेत. यासाठी पोलिसांनी जगजागृती केली असली तरी सर्वसामान्यांना दंड आवाक्याचे बाहेर गेले आहेत. सध्या मशीन असल्याने अनेकांचे दंड पेडींग राहत आहेत. यामुळेही एकदम दंडाची रक्कम ऐकून डोळे पांढरे होण्याची वेळ येत आहे. दरम्यान, युवराज लोखंडे याची कोराने काळात नोकरी गेली आहे. यामुळे तो बेरोजगार झाला आहे. ट्रिपल सीट, लायसन व एक नंबर प्लेट नसणे ही चूक असल्याची कबुलीही त्याने दिली. मात्र दंडाची रक्कमच मोठी झाल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. गुन्हा दाखल झाल्याने पोलीस पुढील तपास करत आहेत.

Back to top button