गुरू ग्रहवरील काळा डाग कशाचा? सापडले उत्तर! | पुढारी

गुरू ग्रहवरील काळा डाग कशाचा? सापडले उत्तर!

वॉशिंग्टन : अंतराळाचा पसारा जसा गहन आहे तशीच त्यामधील रहस्येही गहनच आहेत. आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा (आणि कदाचित सर्वात जुना) ग्रह म्हणजे गुरू. निव्वळ वायूचा गोळा असलेल्या या ग्रहावर दीर्घकाळापासून मोठी वादळे होत आहेत. ही वादळे दर्शवणारा तांबडा डाग अनेकांना ठाऊक आहे. मात्र, एका छायाचित्रात दिसणारा गुरूवरील काळा डाग कशाचा आहे याचे कुतुहल निर्माण झाले होते. आता याचे कोडे उलगडले असून हा काळा डाग नसून ती गुरूच्या चंद्राची सावली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वैज्ञानिकांनी म्हटले आहे की हा ग्रह प्रामुख्याने हेलियम आणि हायड्रोजन वायूंनी बनलेला आहे. ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी गुरूचे एक छायाचित्र सोशल मीडियात शेअर केले. त्यामध्ये गुरूवर एक काळा डागही असल्याचे दिसून येते. गुरूच्या डाव्या बाजूला दिसणारा हा काळा डाग पाहून लोकांना हे नेमके काय आहे असा प्रश्‍न पडला.

त्याचे उत्तरही संशोधकांनी दिले आहे. हा काळा डाग म्हणजे गुरूच्या अनेक चंद्रांपैकी एक महत्त्वाचा चंद्र ‘गॅनिमेड’ची सावली आहे. हे छायाचित्र 25 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात आले होते. गुरूवरील ग्रहण पृथ्वीवरूनही पाहता येऊ शकते असे ‘नासा’ने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. गुरूचे चार प्रमुख चंद्र आहेत जे नेहमी गुरू आणि सूर्याच्या मधून जात असतात. गॅनिमेड हा चंद्र तर आठवड्यातून एकदा असे करतो.

युरोपा चंद्र दोन वेळा आणि लो आठवड्यातून चार वेळा असे करतो. यावेळी चंद्राची सावली गुरूवर पडते. गुरूचे एकूण 79 चंद्र आहेत. त्यापैकी चार अतिशय मोठ्या आकाराचे आहेत. त्यांना ‘गॅलिलियन मून’ असेही म्हटले जाते. याचे कारण म्हणजे त्यांचा शोध गॅलिलिओने घेतला होता. या चंद्रांपैकी सर्वात मोठा चंद्र म्हणजे गॅनिमेड. त्याचीच सावली या छायाचित्रात काळ्या डागासारखी दिसत आहे.

Back to top button