अमोल मिटकरी तमाशाच्या फडावरचा नाचा; सदाभाऊंची घसरली जीभ | पुढारी

अमोल मिटकरी तमाशाच्या फडावरचा नाचा; सदाभाऊंची घसरली जीभ

सांगली, पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोध एकमेकांवर चांगलेच तोंडसूख घेताना दिसत आहे. राष्ट्रवादीच्या सभेत अमोल मिटकरी यांनी कडकनाथ कोंबडीचा उल्लेख करत सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला होता. त्याचेच प्रत्युत्तर म्हणून सदाभाऊंनी अमोल मिटकरींवर टीका करताना आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले की, “अमोल मिटकरी हा तमाशाच्या फडावरचा नाचा आहे,” राजकीय वर्तुळात खोत यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच वातावरण गरम होण्याची शक्यता आहे.

सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, “अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा आहे. त्याचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही. तोडा फोडा अशी राष्ट्रवादीची नीती आहे. अनेक नेते प्रत्येक समाजाचे घ्यायचे जातीयवाद करायचा आणि पवारसाहेब आपले तारणहार आहेत. हे समाजाला समजावण्याचा काम राष्ट्रवादी मधील नेते करतात”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी  राष्ट्रवादीवर केली.

खोत पुढे म्हणाले की, “महाविकास आघाडी हे विकास कामावर बोलायला तयार नाही. पण एक शकुनी मामा सतरंजीवरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रीत करण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामांचा सुळसुळाट असतो, त्याची सेना कौरवाची सेना असते आणि आम्ही पांडवाची सेना या कौरवांचा नाश करेल”, असाही आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केले.

“जागर शेतकऱ्याचा, आक्रोश बहुजनांचा हे राज्यव्यापी अभियान २९ एप्रिलपासून कोकणातून सुरू करत आहोत. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्याच्या आत्महत्या, लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाविकास आघाडी सरकारची केवळ फालतुगिरी सुरू आहे. हे सरकार भरतीवर बोलत नाही. आरोग्य भरतीमध्ये घोटाळा केला आहे. हे सर्व जनतेसमोर या अभियानातून मांडण्यात येणार आहे”, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

पहा व्हिडिओ : सीमा प्रश्‍नाची दखल | अग्रलेख | पुढारी

Back to top button