सांगली : भाजप सभापतीविरोधात भाजपचे आज मौनव्रत | पुढारी

सांगली : भाजप सभापतीविरोधात भाजपचे आज मौनव्रत

सांगली : पुढारी वृत्तसेवा पक्ष आदेश डावलून स्थायी समितीमध्ये भाजपच्या सभापतींकडून जनहितविरोधी घनकचरा प्रकल्पाची वादग्रस्त निविदा मंजूर केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता शहर जिल्हा भाजपतर्फे महानगर कार्यालयात मौनव्रत आंदोलन केले जाणार आहे. भाजप कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.

घनकचरा प्रकल्पाची वादग्रस्त निविदा यापूर्वी भाजपची सत्ता असलेल्या स्थायी समितीने अ‍ॅागस्ट 2020 मध्ये रद्द केली होती. जनहितविरोधी निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याचा ठराव करण्यात आला होता. संबंधित कंपनीला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्याचे आदेशही दिलेले होते. ही सर्व पार्श्वभूमी असताना व पक्षाची भूमिका माहिती असतानाही भाजपचेच सध्याचे स्थायी समिती सभापती यांनी ऐनवेळचा विषय आणून निविदा मंजुरीचा ठराव केला आहे.

तो रद्द करावा, यासाठी आंदोलन केले जात आहे, असे भाजपच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने म्हणाले, जनहितविरोधी निविदा मंजुरीचा ठराव केल्याने भाजपची जनतेमध्ये मोठी बदनामी होत आहे. अगोदर तोट्याची असलेली घनकचरा प्रकल्प निविदा आता फायद्याची कशी झाली? यात भ्रष्टाचार झाला आहे का, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत. त्यापुढे भाजप कार्यकर्त्यांना निरुत्तर व्हावे लागत आहे.

त्याचा सांगली शहर जिल्हा भाजपच्या कट्टर व एकनिष्ठ तसेच निस्वार्थीपणे अहोरात्र पक्षासाठी काम करत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. स्थायी समिती सभापतींनी भाजपचा आदेश डावलून केलेल्या ठरावाचा निषेध व ठराव रद्द करावा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी 11 वाजता स्फूर्ती चौक सांगली येथील भाजपच्या महानगर कार्यालय येथे एक दिवसीय मौनव्रत आंदोलन करण्यात येत आहे, असे संघटन सरचिटणीस माने यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील विविध प्रदेशांत सापडलेली 85 संरक्षित भारतीय कासवे उत्तर प्रदेशात

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने भाजपच्या सभापतींनी केला जनहितविरोधी ठराव

भाजपच्या स्थायी सभापतींनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने जनहित विरोधी घनकचरा निविदेचा ठराव मंजूर केला आहे. त्याला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपचे प्रदेश सदस्य शेखर इनामदार तसेच सर्वच प्रमुख नेत्यांनी विरोध केला आहे, निविदा रद्दसाठी आयुक्तांना पत्र दिले असल्याचे भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी सांगितले.

हेही वाचलतं का?

Back to top button